

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नित आणि एआयसीटीई मान्यताप्राप्त पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व तंत्रनिकेतने आणि संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी 'स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना' लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा अनिवार्य करण्यात आला असून, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मिळून पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. वैद्यकीय विम्याचा लाभ घेणे मात्र ऐच्छिक ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने राज्यातील तंत्रनिकेतने आणि संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे, तर प्रवेश अर्जात नमूद केलेल्या पालकाला किंवा पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीला चार लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व तसेच अपघातामुळे होणाऱ्या अंशतः अपंगत्वासाठी विमा संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व तंत्रनिकेतने आणि संस्थांनी आपल्या संकेतस्थळावर योजनेची माहिती उपलब्ध करून द्यावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून त्यांना विमा संरक्षणाची माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळही विकसित करण्यात आले असून, त्यावर मार्गदर्शन आणि शंकानिरसनासाठी हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध आहे.
तंत्रनिकेतने आणि संस्थांनी विद्यार्थ्यांची विमा योजनेतील नोंदणी पूर्ण करून त्याचा अहवाल १५ डिसेंबर २०२६ पर्यंत संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर करायचा आहे. असे मंडळांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्याला दोन लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण
अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास विमा रकमेच्या १०० टक्के भरपाई मिळू शकते. याशिवाय अपघातामुळे विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागल्यास उपचार खर्चासाठी वैद्यकीय विम्याचीही तरतूद आहे. या वैद्यकीय विम्याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दोन लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण उपलब्ध होऊ शकते. मात्र, हा वैद्यकीय विमा पूर्णपणे ऐच्छिक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.