Polytechnic admission 2026 : पॉलिटेक्निक प्रवेशाचा नवा विक्रम!

पहिल्याच कॅप फेरीत ८९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वाटप
Polytechnic admission 2026
Polytechnic admission 2026file photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील पदविका (पॉलिटेक्निक) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्याच फेरीत तब्बल ८९ हजार ६३१ विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वाटप करण्यात आले असून, ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत ७ हजार ८०१ ने अधिक आहे. त्यामुळे राज्याच्या पॉलिटेक्निकच्या पहिल्याच फेरीत सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ४९ हजार ६७८ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांना इच्छित संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे.

यंदाच्या प्रवेश कॅप प्रक्रियेत ४४२ संस्था (४२० पॉलिटेक्निक व २२ वास्तुकला महाविद्यालये) सहभागी झाल्या असून, १ लाख ३७ हजार ६२७ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत १७ हजार ५३ जागांनी अधिक आहे. अंतिम गुणवत्ता यादीत १ लाख ४० हजार ३७१ विद्यार्थ्यांचा समावेश झाला होता. त्यापैकी १ लाख २१ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम निश्चित केला.

Polytechnic admission 2026
11th Admission: राज्यात अकरावीच्या १६ लाख जागा रिक्त! एकूण क्षमतेच्या तुलनेत केवळ २८.८८ टक्के जागांवर प्रवेश

या विद्यार्थ्यांमधून ८९ हजार ६३१ जणांना प्रवेशाचे वाटप करण्यात आले. यंदा प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा ४ हजार ९०५ ने वाढली आहे. विशेष म्हणजे, ७० ते ८४ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग प्रवेश प्रक्रियेत दिसून आला आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा वाढता कल पदविका अभ्यासक्रमांकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅपच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १८ जुलै पर्यंत प्रवेशाची जागा स्वीकारून संबंधित संस्थेत कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर रिक्त जागांची माहिती जाहीर करून दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

Polytechnic admission 2026
11th Admission: मुंबईत सर्वाधिक १ लाख ७३ हजार २२३ अर्ज लॉक; राज्यातील ६ लाख ८० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

जागावाढीमुळे प्रवेशाला चालना

उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन यंदा अनेक संस्थानी अभ्यासक्रमांना मान्यता घेतली आहे. सुरू करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे. राज्यात २६ नवीन पॉलिटेक्निक संस्था सहभागी झाल्यामुळे प्रवेशक्षमता १ लाख २२ हजार ३२४ वरून १ लाख ३६ हजार ५८७ इतकी वाढली असून, अवघ्या एका वर्षात १४ हजार २६३ जागांची भर पडली आहे. या वाढीमुळेच पहिल्याच फेरीत विक्रमी ८९ हजार ६३१ विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वाटप करणे शक्य झाले असल्याची माहिती संचालनालयाने दिली.

एआय, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल शाखांना सर्वाधिक बळ

अभ्यासक्रमनिहाय जागावाढीवर नजर टाकल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान शाखांना यंदा सर्वाधिक प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येते. 'कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग' या अभ्यासक्रमात सर्वाधिक ३ हजार ५१६ जागांची वाढ झाली आहे. त्याखालोखाल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (१,९०९), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (१,४९७), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (१,३८०), सिव्हिल इंजिनिअरिंग (१,२९६), कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (१,०५०) आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (१,००५) या शाखांमध्येही मोठ्या प्रमाणात जागा वाढल्या आहेत.

याशिवाय डेटा सायन्स, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांनाही चालना देण्यात आली आहे. यावरून पारंपरिक शाखांसोबतच उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने भर दिली आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीतूनच आधुनिक तंत्रज्ञानाधारित शाखांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल स्पष्ट झाला असून, आगामी कॅप फेऱ्यांमध्ये एआय, कॉम्प्युटर, डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल या शाखांसाठी स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • यंदा विभागनिहाय पाहता पुणे विभागात सर्वाधिक ४ हजार ४५३ जागांची वाढ झाली आहे. संस्थांची संख्या ११० वरून ११५ झाली आहे. त्यापाठोपाठ नाशिक विभागात ३ हजार २७०, मुंबई विभागात १ हजार ११०, नागपूर विभागात ६६०, छत्रपती संभाजीनगर विभागात ४६५ आणि अमरावती विभागात १२० जागांची वाढ झाली आहे. औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असलेल्या मुंबई, पुणे आणि नाशिक विभागांमध्ये प्रवेशक्षमता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news