

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दिल्लीहून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो, असा टोमणा हाणत राऊत म्हणतात, शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत. ही लोकेच्छा आहे; त्यासाठी कुणाच्या आदेशाची किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्षही एकत्र आहेत. पूर्वाश्रमीच्या ट्विटरवर म्हणजेच एक्सवर ही पोस्ट टाकून राऊत यांनी मुंबईत काँग्रेस वगळून व्यापक आघाडीचे संकेत दिले आणि या संभाव्य महाआघाडीबाबत नवीन चर्चांना उधाण आले.
काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही राऊत यांनी मनसेसोबतची जवळीक उघडपणे व्यक्त केली. या बदलत्या समीकरणाचे संकेत शनिवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीतूनही मिळाले. या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह आणि आवश्यकतेनुसार राज ठाकरे यांच्या मनसेसोबतही युती करण्यास हरकत नसल्याचे संकेत दिले. भाजपविरोधी मते एकत्र ठेवण्यासाठी विविध शक्यतांवर गंभीरपणे चर्चा करण्यात आली.
काँग्रेसने दिल्लीकडे बोट दाखवले असले तरी, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि उद्धवसेनेला सोबत घेण्याबाबत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल असल्याचे मुंबईत शनिवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्षाच्या अनेक नेत्यांनी मनसेला सोबत घेण्याविषयी सकारात्मक भूमिका मांडली. याच बैठकीत राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंशी चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईतील राजकारणाला मोठी कलाटणी मिळू शकते. केवळ मनसेच नाहीतर समाजवादी पक्षालाही सोबत घेण्यास हरकत नसल्याचे मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीत मांडले.या बैठकीला खा. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, राज्याचे माजी मंत्री व माजी मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी, प्रदेश उपाध्यक्षा व प्रवक्त्या विद्या चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले की, मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपला रोखणे हे प्रमुख लक्ष्य आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, समाजवादी पक्ष, अगदी राज ठाकरे यांची मनसे यासोबतही चर्चा होऊ शकते. गेल्या काही वर्षांत महापालिकेवरील नियंत्रणासाठी भाजपने आक्रमक तयारी केली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही रणनीतीमध्ये मोठा बदल करण्याचे संकेत यातून दिले.
काँग्रेस पक्षात या विषयावर मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी हातात हात घालून उतरण्याची गरज असल्याचे सांगितले होते. मात्र, मनसेसोबत युती करण्याला काँग्रेसचा स्पष्ट विरोध असल्याचे सांगितले गेले, काँग्रेसने एकच भूमिका मांडली होती, महाविकास आघाडी हवी; पण मनसे त्यात नको. तरीही वडेट्टीवार यांनी भाजपला रोखण्यासाठी सर्व शक्यतांचा विचार झाला पाहिजे, असा मुद्दा मांडला.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मात्र पूर्णपणे वेगळी भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मारझोड करणारे, हिंसक राजकारण करणारे पक्ष आमचे मित्र होऊ शकत नाहीत. गायकवाड यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहकार्याबाबत सकारात्मक संकेत दिले; परंतु मनसेसोबत कोणतीही चर्चा न करण्याचा दंडक कायम ठेवला. आता आघाडीबाबत काँग्रेसची पक्षांच्या वेगळी भूमिका असतानाही शरद पवार यांनी ठाकरे बंधूंसोबत जाण्याचे संकेत दिल्याने काँग्रेसची अडचण झाली आहे.