मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना येत्या ५ जुलैपासून मिळणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. योजनेतील अटीत बदल करण्याची आणि त्यासाठी स्थापन केलेली उपसमिती सकारात्मक निर्णय घेईल, याचा पुनरुच्चारही भरणे यांनी केला.
सोमवारी विधानसभेत सन २०२६-२७ या वर्षातील कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य , महिला आणि बालविकास विभागाच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. शेतकरी कर्जमाफी ३० जूनपूर्वी दिली जाईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार आपण पुरवणी मागणीत कर्जमाफीच्या रकमेची तरतूद केली आहे. ५ जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम अदा केली जाईल, असे भरणे यांनी सांगितले. कृषी समृद्धी योजनेसाठी निधी दिला जात नसल्याचा मुद्दा भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना भरणे यांनी अर्थसंकल्पात यासाठी २ हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली. हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात आणखी ३ हजार कोटींची तरतूद केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.