

मुंबई: राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी गावातील सरकारी शाळेची इमारत कोसळून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही भीषण दुर्घटना आज (दि.२५) सकाळी प्रार्थनेवेळी घडली. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलत राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.
राज्य शिक्षणमंत्री पंकज भोयर यांनी आज (दि.२५) एका उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील सर्व सरकारी शाळांचे सुरक्षा ऑडिट (Safety Audit) करण्याचे आणि धोकादायक इमारतींना तातडीने निधी देण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेश मंत्री भोयर यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिले आहेत.
राजस्थानमधील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या इमारतींच्या सद्यस्थितीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. राजस्थानसारखी दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री भोयर म्हणाले, "विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. राजस्थानची घटना अत्यंत वेदनादायी असून, त्यातून धडा घेत आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहोत."
बैठकीत राज्यातील शाळांच्या सुरक्षेबाबत मंत्री पंकज भोयर यांनी काही महत्त्वाचे आणि तातडीचे निर्देश दिले आहेत. यामध्ये त्यांनी राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या इमारतींचे तातडीने सुरक्षा ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करावा, ऑडिटमध्ये धोकादायक आढळलेल्या शाळांच्या इमारतींच्या दुरुस्ती आणि डागडुजीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, या दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हा नियोजन निधीमधून (DPDC) आवश्यक निधी तातडीने वर्ग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येणार नाही, याची संपूर्ण खबरदारी शिक्षण विभागाने घ्यावी, असेही त्यांनी बजावले. या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, पावसाळ्यात शाळांच्या धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.