

मुंबई : विधानसभेत रमी खेळताना पकडले गेले म्हणून मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते काढून घेण्यात आल्यानंतर विरोधकांनी आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरील कारवाईसाठी दबाव वाढवला आहे. त्यातच आपल्या सावली बारला मिळालेला ऑर्केस्ट्राचा परवाना कदम यांनी परत केल्याने ठाकरे गटाच्या टीकेला आणखी धार चढली आहे.
ज्या गृहराज्यमंत्र्यांवर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांच्याच घरात महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोष्टी सुरू आहेत. आता त्यांनी ऑर्केस्ट्राचा परवाना परत केला, याचा अर्थ त्यांनी तिथे अवैध काम चालू होते हे मान्य केले आहे. त्यामुळे चोराने चोरीचा माल पोलिसांना परत केला म्हणजे सुटका झाली असे नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर हल्ला चढवला.
सावली हॉटेलचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता, डान्सबार चालवण्यासाठी नाही. अवैध धंदे, वेश्या व्यवसायासाठी आणि पिकअप पॉइंटसाठी दिला नव्हता, अशी टीका करत तिथे डान्सबार होता हे पोलिसांनी आतापर्यंत मारलेल्या चार छाप्यांतून समोर आल्याचे परब आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रपरिषदेत म्हणाले. कदम यांनी ऑर्केस्ट्राचा परवाना परत केला, याचा अर्थ त्यांनी मान्य केले की तिथे अवैध काम चालू होते. अन्यथा परवाना परत करायचे कारण काय होते? असा सवाल परब यांनी केला. आम्ही केलेल्या आरोपांचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुरावे तपासावे आणि गृह राज्यमंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परब यांनी केली.
शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शिरसाट आणि योगेश कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली. अजित पवारांनी आपल्या मंत्र्यावर कारवाई केली आहे. आता एकनाथ शिंदे यांनीही शिरसाट आणि योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी. त्यांची पाठराखण करू नये. कमरेचे काढून डोक्याला बांधून फिरू नये, अशी टीका अंधारे यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याचा दावा शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. अशा लोकांबरोबर मला काम करणे अवघड झाले आहे. सरकारची व राज्याची बदनामी होत असल्याने निर्णय घ्यावा लागणार असल्याचे फडणवीस यांनी अमित शहा यांना सांगितल्याचा दावाही राऊत यांनी केला.
माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते काढून घेऊन त्यांना क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रिपद देणे हा क्रूर विनोद आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली असून कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तरुण पिढी ऑनलाईन रमीमुळे बरबाद होत असताना, कोकाटेंना क्रीडा व युवक कल्याण खाते देण्याचा निर्णय सुळे यांनी अनाकलनीय आणि चुकीचा ठरवला.