

maharashtra municipal election result raj thackeray mns bmc elections
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी 'ठाकरे बंधुं'ची जोडी सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळत असून, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा पक्ष तब्बल २२ शहरांमध्ये शून्यावर बाद झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेसह (BMC) राज्यातील २९ शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) धडाकेबाज कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेत प्रथमच भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा गाठताना दिसत आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर नागपूरपासून पुण्यापर्यंत भाजपने विजयाचा झेंडा फडकवला असून, या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप आपला महापौर विराजमान करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, मुंबईवर दीर्घकाळ वर्चस्व गाजवणाऱ्या ठाकरे बंधूंना मतदारांनी कौल न दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई महापालिकेच्या मतमोजणीत भाजपसह महायुतीने १२० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत बहुमताकडे कूच केली आहे. भाजप आणि शिंदे यांची शिवसेना हे समीकरण मतदारांच्या पसंतीस उतरले आहे. मात्र, 'मराठी माणूस' आणि 'मराठी अस्मिते'चा मुद्दा आक्रमकपणे मांडणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला या निवडणुकीत मोठी चपराक बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मुंबई, पुणे किंवा उर्वरित महाराष्ट्र, अशा कुठेही मनसेला अपेक्षित जनसमर्थन मिळताना दिसत नाहीये.
आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार, मुंबईत भाजप युतीला प्रचंड यश मिळत असताना मनसेला मात्र दोन अंकी संख्या गाठणेही कठीण झाले आहे. केवळ मुंबईतच नव्हे, तर मुंबईबाहेरील इतर शहरांमध्येही मनसेचा दारुण पराभव झाला आहे. २२ शहरांमध्ये मनसेला खातेही उघडता आलेले नाही, हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
मनसेने सर्व २९ शहरांमधील सर्व जागांवर उमेदवार उभे न करता केवळ काही निवडक जागांवर लक्ष केंद्रित केले होते. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत (UBT) युती करून मनसेने निवडणूक लढवली होती. सुमारे २० ते ३० जागांवर मनसेने पूर्ण ताकदीनिशी लढा दिला होता, परंतु सद्यस्थितीत त्यांना केवळ ८ जागांवर विजय मिळताना दिसत आहे. ठाकरे बंधू एकत्र येऊनही मतदारांनी दिलेला हा कौल मनसेसाठी आत्मचिंतनाचा विषय ठरणार आहे.