

मुंबई : मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुती सत्तेची शर्यत पार करणार, असा अंदाज ‘एक्झिट पोल’ अर्थात मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला आहे. तर, राज्यातील अन्य महापालिकांतही भाजपचा वरचष्मा राहणार असल्याचे संकेत या चाचण्यांनी दिले आहेत. विविध संस्थांच्या चाचण्यांचे निष्कर्ष पाहिले असता, राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचे दिसते.
शुक्रवारी, मतमोजणीनंतर मतदारांचा जनादेश समोर येणार आहे. तत्पूर्वी, मतदानाचा कालावधी संपल्यानंतर विविध संस्थांचे ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष जाहीर झाले. ‘ॲक्सिस माय इंडिया’, ‘जनमत’, ‘रुद्र रिसर्च’, ‘प्राब’,‘द जेव्हीसी एक्झिट पोल’, ‘जेडीएस’, ‘डीव्ही रिसर्च’ अशा संस्थांनी मतदानाची वेळ संपल्यानंतर तासाभरात आपापल्या ‘एक्झिट पोल’चे अंदाज जाहीर झाले.
विविध ‘एक्झिट पोल’नी वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीचे आव्हान मोडून काढत भाजप महायुतीचा विजयरथ सत्तेवर येण्याची शक्यता आहे. ‘ॲक्सिस माय इंडिया’च्या ‘एक्झिट पोल’नुसार, मुंबई महापालिकेची सत्ता महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील एकूण 227 जागांपैकी भाजप-शिंदे गटाला 131 ते 151 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, ठाकरे बंधूंच्या युतीला 58 ते 68 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेस-वंचित आघाडीला 12 ते 16 आणि इतरांना 6 ते 12 जागा मिळतील, असा अंदाज ‘ॲक्सिस माय इंडिया’ने वर्तविला आहे.
‘जनमत एक्झिट पोल’नेही मुंबईत सत्तापालटाचे भाकीत केले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 138 जागा मिळतील, तर शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांच्या आघाडीला 62 जागा मिळतील. तसेच, काँग्रेस-वंचितला 20, तर इतरांना 7 जागा मिळणार असल्याचा अंदाज ‘जनमत’ने व्यक्त केला आहे. ‘रुद्र रिसर्च’नुसार, मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गट 121, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे 71, काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला 25 जागा मिळतील, तर इतरांना 10 जागा मिळतील.
‘द जेव्हीसी एक्झिट पोल’नेही मुंबईत भाजप-शिंदे गट महायुतीला 129 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर, ठाकरे बंधूंना 54 ते 64 जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेस-वंचित आघाडी 21 ते 25 आणि इतरांना 6 ते 9 जागा मिळू शकतात, असा अंदाज या ‘एक्झिट पोल’ने व्यक्त केला आहे. ‘टाईम्स नाऊ’च्या ‘एक्झिट पोल’नुसार, मुंबईत भाजपची सत्ता येणार असून, मतांची टक्केवारीही महायुतीच्या बाजूने राहणार असल्याचा दावा केला आहे. महायुतीला 42 ते 45 टक्के, ठाकरे बंधूंच्या आघाडीला 34 ते 37 टक्के, तर काँग्रेस-वंचित आघाडीला 13 ते 15 टक्के मते मिळण्याची शक्यता असून, इतरांच्या मतांची टक्केवारी 6 ते 8 असण्याचा अंदाज ‘टाईम्स नाऊ’ने वर्तविला आहे.
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व
‘साम’च्या ‘एक्झिट पोल’नुसार, वसई-विरारमध्ये भाजपला 27, शिवसेना शिंदे गटाला 5, काँग्रेसला 3, शिवसेना ठाकरे गटाला 7, वंचितला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 42 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मनसे 6 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 2 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर, वंचित बहुजन आघाडी 2 जागांवर आणि इतर 6 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.
पिंपरीत भाजपची सत्ता?
पिंपरीचादेखील ‘एक्झिट पोल’ समोर आला असून, इथेदेखील भाजपला जास्त मते मिळत असल्याचा अंदाज ‘प्राब’ने वर्तवला आहे. ‘प्राब’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, पिंपरीमध्ये भाजपला 64, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 51, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शरद पवार गटाला 2, शिवसेना ठाकरे गटाला शून्य, मनसेला एक, तर वंचितला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याचा अंदाज
‘प्राब’नुसार, पुण्यात भाजपला 93, शिवसेना शिंदे गटाला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गटाला 7, शरद पवार गटाला 8, काँग्रेसला 8 आणि मनसेला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज ‘प्राब’ने वर्तवला आहे.
कोल्हापुरातही महायुतीचा झेंडा
‘जेडीएस’च्या ‘एक्झिट पोल’नुसार, कोल्हापुरात भाजपला 29-32, शिवसेना शिंदे गटाला 18-21, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 9-11 जागा मिळण्याची शक्यता आहे; तर काँग्रेसला 19-23, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0-1, शिवसेना ठाकरे गटाला 3-4, मनसेला 0-1, तर इतरांना 2-4 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.