कर्नाटक सरकारने चित्रपटप्रेमींसाठी महत्त्वाचा निर्णय घेत मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांतील तिकिटांचे दर 200 निश्चित केले आहेत. विशेष म्हणजे, हे दर करांसह लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही चित्रपटगृहांतील तिकीट दर कमी व्हावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तिकिटांचे दर कमी केले तर मराठी प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाकडे वळतील, असा विश्वास चित्रपट निर्माते, वितरकांनी व्यक्त केला.
सध्या राज्यात 900हून अधिक मल्टिप्लेक्स आणि एक पडदा चित्रपटगृहे आहेत. अनेकदा शनिवारी, रविवारी अनेक चित्रपटगृहांतील तिकिटांचे दर 1000 च्या पुढे जातात. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते.तिकिटांचे दर कमी केल्यास प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतील, असेही मत काही चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केले.
शुक्रवारी कमीत कमी पाच ते सहा चित्रपट प्रदर्शित केले जातात. जर एखाद्या शोला प्रेक्षकांकडून खूप कमी प्रतिसाद मिळाला, तर काय करणार? 15, 20 लोक जर चित्रपट पाहायला आले, तर चित्रपटगृहाचा खर्च आणि तिथे काम करणार्या कर्मचार्यांचा खर्च त्यातून कसा भागवायचा? चित्रपटाला प्रतिसाद मिळत नसेल तर आम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे तिकिटांचे दर कमी करायचे असतील तर आमच्याही बाजूचा विचार केला जावा, अशी अपेक्षा चित्रपटगृहांच्या मालकांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात शंभर ते तीनशे रुपयांपर्यंतच्या तिकिटांना 18 टक्के, तर 300 रुपयांच्या पुढे 28 टक्के जीएसटी लागू होतो. या कराची दोन भागांत विभागणी केली जाते. एक हिस्सा राज्य सरकारचा जीएसटी आणि दुसरा केंद्र सरकारचा जीएसटी. तिकिटांचे दर कमी करायचे असतील तर हे ‘जीएसटी’चे समीकरण बदलावे लागेल.
मंगळवारी 99 रुपयांत चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होते. मात्र, तसा प्रतिसाद शनिवारी, रविवारी मिळत नाही. त्यात मोठा फरक असतो. चित्रपटगृहांतील तिकिटांचे दर कमी झाले, तर प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतील. तो प्रेक्षकांसाठी घेतलेला निर्णय असेल आणि अशा निर्णयाचे आम्ही सगळे स्वागतच करू.
केदार शिंदे, दिग्दर्शक
महाराष्ट्रात तिकिटाचे दर 200 रुपये करावेत. मल्टिप्लेक्ससारख्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायचा म्हटलं तर दोन हजार रुपये खर्च येतो. एवढे पैसे खर्च करून प्रेक्षक चित्रपट पाहायला का येतील? तिकिटाचे दर कमी करण्यासोबतच चित्रपट निर्मात्यांनी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करावी, जेणेकरून प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाकडे वळतील.
हेमंत ढोमे, अभिनेता, निर्माता
प्रेक्षकांची पावले पुन्हा चित्रपटगृहांकडे वळणे आवश्यक आहे. मल्टिप्लेक्स चित्रपटातगृहांमध्ये चारशे रुपये तिकीट आणि इतर खर्च करून चित्रपट पाहायला जाणारा प्रेक्षकवर्ग कमी झाला आहे. चित्रपटगृहांतील तिकिटांचे दर कमी झाले तरच ही परिस्थिती काही प्रमाणात सुधारेल.
समीर दीक्षित, चित्रपट वितरक
मंगळवार, गुरुवारी दोन दिवस 99 रुपयांत चित्रपट दाखवला जातो. जर दोन दिवस या दरात चित्रपट दाखवणे परवडत असेल, तर इतर दिवशी का परवडत नाही? चित्रपटांचे मल्टिप्लेक्समधील दर 2000 च्या पुढे गेले आहेत. प्रेक्षकांनीच सिनेमा जगवला. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी तिकिटांचे दर कमी व्हायला हवेत.
दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक