Medical state quota timetable : वैद्यकीय अभ्यासक्रमांचे राज्य कोट्याचे वेळापत्रक जाहीर

एमबीबीएस, बीडीएसची पहिली गुणवत्ता यादी 7 ऑगस्ट रोजी
Medical state quota timetable
वैद्यकीय अभ्यासक्रमांचे राज्य कोट्याचे वेळापत्रक जाहीरFile Photo
Published on
Updated on

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राज्य कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या अभ्यासक्रमांसाठी 23 ते 30 जुलैदरम्यान नोंदणी करता येणार आहे. एमबीबीएस व ‘बीडीएस’साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी 2 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर पहिली गुणवत्ता यादी 7 ऑगस्टला जाहीर होणार आहे.

नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल 14 जून रोजी जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) अखिल भारतीय कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्याचवेळी राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबविण्यांसदर्भातही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य कोट्याअंतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमासाठी 23 ते 30 जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलने सुरू केली आहे.

राज्यभरात विविध अभ्यासक्रमांसाठी एकूण 48 हजार 039 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा आयुर्वेद पदवी (बीएएमएस) अभ्यासक्रमासाठी असून एकूण 9 हजार 731 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर बीएचएमएस (बीएचएमएस) होमिओपॅथी अभ्यासक्रमासाठी 4 हजार 417, बीपीटीएच (बीपीटीएच) फिजिओथेरपीसाठी 5 हजार 195 आणि एमबीबीएससाठी 8 हजार 141 जागा आहेत.

यात 36 शासकीय महाविद्यालयांत 4 हजार 157 जागा असून, 5 अनुदानित संस्थांमध्ये 764 आणि 23 खासगी संस्थांमध्ये 3 हजार 220 जागा आहेत. तर दुसरीकडे बीडीएस (बीडीएस) दंतशास्त्र अभ्यासक्रमासाठी एकूण 2 हजार 675 जागा असून यातील बहुतांश जागा खासगी महाविद्यालयांत आहेत.

या विविध अभ्यासक्रमांसाठी 23 ते 31 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना शुल्क भरून त्यांची नोंदणी निश्चित करायची आहे. तसेच 23 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या कलर प्रती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी मुदत दिली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी 2 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून, त्यातील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची अंतरिम यादी आणि जागांचा तपशील 2 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीसाठी 3 ते 5 ऑगस्टदरम्यान महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे.

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी 7 ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना 8 ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली. दरम्यान, वेळापत्रकादरम्यान शनिवार, रविवार आणि अन्य सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही एमसीसीने दिल्या आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक एमसीसीकडून जाहीर करण्यात आले असले तरी आयुष अभ्यासक्रमांतर्गत असलेल्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आणि निमवैद्यकीय अभ्यासक्रम असलेल्या बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक संबंधित परिषदेकडून जाहीर करण्यात आल्यावर त्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र या सर्व अभ्यासक्रमांसाठी नोंदणी एकत्रितच करण्यात येत असल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news