

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमबीबीएस आणि बीडीएस पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दोन्ही अभ्यासक्रमांच्या एकूण ११ हजार ४३१ जागांपैकी ११ हजार ३४० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, ९१ जागा रिक्त राहिल्या आहेत.
यामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ८ हजार ८११, तर बीडीएस अभ्यासक्रमाच्या २ हजार ५२९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली.
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी राज्यातील ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५ हजार ६५ जागा उपलब्ध होत्या.
या सर्व जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच २५ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील ३ हजार २९९ जागाही भरल्या आहेत. दुसरीकडे, दोन खासगी वैद्यकीय विद्यापीठांमधील ४५० जागांपैकी ४४७ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, तीन जागा रिक्त आहेत.
त्यामुळे एमबीबीएसच्या एकूण ८ हजार ८१४ जागांपैकी ८ हजार ८११ जागांवर प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत २ हजार ६१७ जागांपैकी २ हजार ५२९ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, ८८ जागा रिक्त आहेत.
राज्यातील पाच शासकीय बीडीएस महाविद्यालयांमधील ३१७ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. २३ खासगी बीडीएस महाविद्यालयांमधील २ हजार २०० जागांपैकी २ हजार १२० जागांवर प्रवेशाची संधी मिळाली असून, ८० जागा रिक्त आहेत. तसेच एका खासगी बीडीएस विद्यापीठातील १०० जागांपैकी ९२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, आठ जागा रिक्त राहिल्या आहेत.