

मुंबई ः कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशासाठी आणखी एक संधी दिली आहे. तब्बल सहा फेरीत आतापर्यंत 1 लाख 25 हजार 820 विद्यार्थ्यांनी प्रवेश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आयटीआय प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्यांना या महिनाअखेरपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करुन प्रवेश घेता येणार आहे.
राज्यातील खासगी आणि शासकीय अशा 1 हजार आयटीआयमध्ये विविध ट्रेड्ससाठी प्रवेश प्रक्रियेच्या सहा कॅप फेर्या आतापर्यंत पार पडल्या. या सहा फेर्यांमधून आतापर्यंत 1 लाख 25 हजार 820 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. यामध्ये 1 लाख 4 हजार 200 मुले व 21 हजार 619 मुली सहभागी झाल्या. शासकीय आयटीआयमध्ये 88 हजार 444, तर खासगी आयटीआयमध्ये 37 हजार 376 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विभागनिहाय नाशिक (24 हजार 352), पुणे (23 हजार 275) व नागपूर (22 हजार 501) आघाडीवर आहेत. लोकप्रिय ट्रेडमध्ये इलेक्ट्रीशियन (23 हजार 363), फिटर (15 हजार 423) व वेल्डर (12 हजार 985) अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. या सहा फेर्यांनंतरही प्रवेश न घेतलेल्या किंवा नव्याने प्रवेश घ्यायचा आहे अशांना आता संधी देण्यात आली आहे. हे प्रवेश रिक्त जागांवर होणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. आतापर्यंत झालेल्या प्रवेशांमध्ये इलेक्ट्रिशियनसाठी सर्वाधिक म्हणजे 23 हजार 363 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्या नंतर फिटर या ट्रेडला 15 हजार 423 आणि वेल्डर या अभ्यासक्रमांसाठी 12 हजार 985 प्रवेश झाले आहेत. गतवर्षी आयटीआयसाठी 1 लाख 26 हजार 376 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यावर्षी सहाव्या फेरीपर्यंत 1 लाख 25 हजार 820 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
आता प्रशिक्षण महासंचालनालयाकडून वाढवलेल्या मुदतीमुळे प्रवेश वाढवण्याची संधी आयटीआयला मिळाला आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रवेश अर्ज भरणे शक्य झाले नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जातील चुकांमुळे किंवा प्रवेश अर्ज शुल्क भरणे शक्य न झाल्याने प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता आले नाही अशा विद्यार्थ्यांना या वेळापत्रकानुसार संधी देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीत ज्या अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा आहेत, त्या जागांवर या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे अपेक्षित असल्याने आयटीआयसाठी गेल्या वर्षीएवढेच किंवा त्यापेक्षा अधिक विश्वास आहे.