

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग आणि गुंतवणूक अन्य राज्यांत जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेणारी आकडेवारी समोर आली आहे. वार्षिक सरासरीच्या 95 टक्के परकीय गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी समाजमाध्यमांत गुंतवणूकविषयक आकडेवारी मांडत याबाबतची माहिती दिली. ‘पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक अर्थात ‘एफडीआय’ आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यांत 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली, तर 1 लाख 19 हजार 556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यांत आली आहे. मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घोडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो. महाराष्ट्र आता थांबणार नाही!’ असे फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानी, तर कर्नाटक दुसर्या, गुजरात तिसर्या, दिल्ली चौथ्या आणि तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.
2020-21 : 1 लाख 19 हजार 734 कोटी
2021-22 : 1 लाख 14 हजार 964 कोटी
2022-23 : 1 लाख 18 हजार 422 कोटी
2023-24 : 1 लाख 25 हजार 101 कोटी
2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांत) : 1 लाख 236 कोटी
(6 महिन्यांतील गुंतवणूक)
महाराष्ट्र : 1 लाख 13 हजार 236 कोटी
गुजरात : 33 हजार 6 कोटी
दिल्ली : 26 हजार 807 कोटी
तामिळनाडू : 13 हजार 553 कोटी