

मुंबई : उद्योगांसाठी महाराष्ट्र सरकारने प्रागतिक पावले उचलली आहेत. त्यामुळे एकीकडे अमेरिकेकडून टॅरिफ युद्ध सुरू असूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. यातून राज्यावर असलेला विश्वास व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर तब्बल 17 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. एकूण 33,768.89 कोटी रुपयांच्या या करारांतून राज्याच्या विविध विभागांत सुमारे 33,483 रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात 17 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण व त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही करारावर सह्या करून थांबणार नाही, तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य सरकार भागीदार म्हणून उद्योगांसोबत राहणार आहे. याबाबत कुठेही अडथळा येणार नाही. उद्योगांसाठी जमीन, परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने मिळवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी मैत्री पोर्टल या वन-स्टॉप संकल्पनेचा विशेष उल्लेख केला.
उद्योगांना स्वस्तात वीज मिळणार
उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक ही स्थिर आणि अंदाजपत्रकानुसार ठेवण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत होईल. राज्यात नुकताच पाच वर्षांचा मल्टी-इयर टॅरिफ मंजूर झाला असून, वीजदर वर्षागणिक कमी होणार आहेत. पूर्वी दरवर्षी वीजदर 9 टक्क्यांनी वाढत असत. आता ते कमी होणार आहेत. हे उद्योगांसाठी मोठे दिलासादायक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या करारादरम्यान मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव पी. अनबलगन, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.