

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शास्त्रात मान्यताच नसलेल्या तथाकथित अँटी-इन्फेक्टिव्ह बेड कव्हर मॅट्स’ च्या खरेदीसाठी तब्बल 4.27 कोटी रुपयांचा खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण संसर्ग रोखण्यासाठी असे कोणतेही बेडशीट नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
महापालिका रुग्णालयांमध्ये संसर्ग नियंत्रणाच्या नावाखाली 43,600 बेड कव्हर मॅट्स खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. फाइलमध्ये या मॅट्सना संसर्ग रोखणारे अत्याधुनिक साधन म्हणून दर्शवण्यात आले असले, तरी ‘अँटी-इन्फेक्टिव्ह बेड कव्हर मॅट’ असे कोणतेही मानक वैद्यकीय उत्पादन अस्तित्वात नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मोठे दावे, पण वैद्यकीय मान्यता शून्य
महापालिकेचा दावा आहे की या मॅट्समध्ये जंतुनाशक व प्रतिजैविक गुणधर्म असून त्या दहा वेळा धुतल्यानंतरही प्रभावी राहतील. मात्र, अशा प्रकारचे बेड कव्हर कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालय प्रोटोकॉलचा भाग नाहीत. संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये या उत्पादनाचा उल्लेख कुठेही आढळत नाही.
उत्तराखंडमध्ये उत्पादन, पेमेंट मुंबईत
महापालिकेच्या अधिकृत कागदपत्रांनुसार, हे मॅट्स उत्तराखंडमधील एका खासगी कंपनीत तयार केले जाणार आहेत. मात्र, पुरवठा व संपूर्ण देयक प्रक्रिया मुंबईतील कंपनीमार्फत होणार आहे. प्रति मॅट 980.58 रूपये दर निश्चित करण्यात आला असून, एकूण कराराची किंमत 4,27,53,288 रूपये इतकी आहे.
कागदावर नियम, प्रत्यक्षात संशय
महापालिकेने गुणवत्ता तपासणी, नमुना चाचणी व अटींचे उल्लंघन झाल्यास काळ्या यादीत टाकण्याच्या तरतुदी दाखवल्या आहेत. मात्र, ज्याचे वैद्यकीय अस्तित्वच संशयात आहे अशा उत्पादनासाठी फक्त दंडात्मक अटी पुरेशा नसतात, असे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.