Mahajyoti funds pending : राज्य सरकारकडे पैसे नसल्याने महाज्योतीचे 126 कोटी थकले!

निधीसाठी पाठपुरावा सुरू; मंत्री संजय शिरसाट यांची विधान परिषदेत माहिती
Mahajyoti funds pending
राज्य सरकारकडे पैसे नसल्याने महाज्योतीचे 126 कोटी थकले!pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : सरकारकडे पैसेच नसल्याने महाज्योतीमधील संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे थकले असल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना 2021-22 वर्षाच्या थकबाकीची रक्कम देणे प्रलंबित आहे. यासाठी 126 कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी मिळावा, यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे. निधी उपलब्थ करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. निधी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली.

महाज्योती पीएचडी अधिछात्र शिष्यवृत्ती योजना 2023 च्या नोंदणी दिनांकापासून विद्यार्थ्यांना अद्याप निधी मिळाला नाही. वारंवार आंदोलने करून देखील शासनाने दखल घेतलेली नाही. या विद्यार्थ्यांनी समुद्रात जलसमाधी आंदोलन सुद्धा केले. बार्टी, सारथी, महाज्योती या तिन्ही संस्थांना समान निधी देण्याबाबत शासन आदेश निर्गमित असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांबाबत भेदभाव करण्यात आला असून केवळ सहा महिन्यांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे उर्वरित निधी कधी देणार, असा प्रश्न आमदार सुधाकर आडबाले यांनी उपस्थित केला.

या प्रश्नाच्या चर्चेत आमदार परिणय फुके, विक्रम काळे, अभिजीत वंजारी, इद्रिस नायकवडी यांनी सहभाग घेतला. त्यावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले, सद्यस्थितीत सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याने ही थकबाकी झाली. निधी उपलब्ध होताच ही थकबाकी देण्यात येईल.

दरम्यान, 2024 पूर्वी घोषित झालेल्या या महामंडळांना कार्यपद्धती निश्चित करुन दिली असून लिंगायत समाजासाठी असलेल्या महात्मा बसवेश्वर महामंडळाची बैठक अधिवेशन कालावधीत घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री शिरसाट यांनी दिली.

सर्व संस्थांना समान पातळीवर आणणार : शिरसाट

अनुसूचित जाती जमातीसाठी बार्टी, मराठा समाजासाठी सारथी आणि आदिवासी समाजासाठी टीआरटी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत योजना आहे. सारथी, बार्टी, आर्टी, टार्टी, महाज्योती या सर्व संस्था समान पातळीवर आणण्याचे शासनाचे धोरण असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक होऊन लवकरच याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news