

State Government Employee Benefits
मुंबई : राज्यातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने सण अग्रिमाची मर्यादा वाढवून २० हजार रुपये केली आहे. या निर्णयामुळे दिवाळीसह विविध दहा सणांच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्याच्या वित्त विभागाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, १ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४,८०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांचे सण अग्रिम अनुज्ञेय राहणार आहे.
या निर्णयानुसार दिवाळी, रमझान ईद, नाताळ, पारशी नववर्ष, संवत्सरी, रोश होशनाह, बुद्ध जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणांसाठी अग्रिम घेता येणार आहे. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीही ही सुविधा लागू राहणार आहे.
सण अग्रिम मंजूर करण्याच्या तसेच त्याची वसुली करण्याच्या अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आल्या आहेत. शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच ५ नोव्हेंबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
वित्त विभागाचे उपसचिव रविकुमार लगनवाड यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात वाढीव अग्रिमाचा लाभ घेता येणार आहे.