

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी एकूण 42 हजार 892 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या. सौर ऊर्जा, डेटा सेंटर, हरित ऊर्जा, इंटिग्रेटेड स्टील प्लांट, औद्योगिक साहित्यांची निर्मिती अशा विविध क्षेत्रांतील या आठ सामंजस्य करारांचा मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, विदर्भ आणि मराठवाड्याला लाभ होणार आहे. यातून 25 हजार 892 रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबतच दोन धोरणात्मक करारांवरही सह्या करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयातील समिती कक्षात या दहा सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव राजेशकुमार, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह तसेच विविध क्षेत्रातील कंपन्यांचे गुंतवणूकदार उपस्थित होते.
उत्पादन क्षेत्रात क्रांतीचे संकेत
महाराष्ट्र राज्य हे आता डेटा सेंटर कॅपिटल आणि सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून, उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे. विविध गुंतवणुकींसाठी महत्त्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार आणि दोन धोरणात्मक करार करण्यात आले. त्यातून राज्यात तब्बल 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 28 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात गुंतवणूक सुरळीत होण्यासाठी शासनाची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यासोबत काम करेल. याशिवाय हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळाली असून आयआयटी मुंबई व आयआयटी मद्रास यांच्यामुळे या प्रकल्पाला गती मिळत आहे. लॉजिस्टिक, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेले करार
सोलर पॅनेल निर्मितीसाठी ज्युपिटर इंटरनॅशनल या कंपनीसोबत 10 हजार 900 कोटी रुपयांचा गुंतवणूक करार, यातून 8 हजार 308 रोजगार निर्मिती.
रोचक सिस्टिम्स या कंपनीसोबत डेटा सेंटरकरिता 2 हजार 508 कोटी रुपयांचा करार, एक हजार रोजगार निर्मिती.
रोव्हिसन टेक हबसोबत डेटा सेंटर सेक्टरकरिता 2 हजार 564 कोटी रुपयांची गुंतवणूक करार, 1100 रोजगार निर्मिती.
वॉव आयर्न अँड स्टीलसोबत पोलाद उद्योगाकरिता 4 हजार 300 कोटी रुपयांचा करार, 1500 रोजगार निर्मिती.
वेबमिंट डिजिटलसोबत डेटा सेंटरकरिता 4 हजार 846 कोटी रुपयांचा गुंतवणूक करार, 2050 रोजगार निर्मिती.
औद्योगिक उपकरणे क्षेत्राकरिता टलास्ट कॉपकोसोबत 575 कोटी रुपयांचा करार, 3400 रोजगार निर्मिती.
हरितऊर्जा क्षेत्रात एलएनके ग्रीन एनर्जीसोबत 4 हजार 700 कोटी रुपयांचा गुंतवणूक करार, 2500 रोजगार निर्मिती.