

मुंबई : आखाती देशात युद्ध सुरू असले तरी राज्यात एलपीजी, पेट्रोल व डिझेल पुरेसे उपलब्ध आहे. ग्राहकांनी भीतीपोटी साठा करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
रेशनिंग नियंत्रक आणि संचालक चंद्रकांत डांगे यांनी सोमवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यातील 8 हजार 126 पेट्रोल पंपांना तेल कंपन्या पुरवठा करत आहेत. सरकारी तेल कंपन्यांचे राज्यात 24 डेपो असून दररोज या माध्यमातून दररोज 18 हजार 500 किलोलिटर पेट्रोल व 40 हजार किलोलिटर डिझेल वितरित केले जात आहे, असेही डांगे म्हणाले.
1 ते 4 एप्रिल दरम्यानची सरासरी विक्री दररोज सुमारे 18 हजार 605 किलोलिटर पेट्रोल आणि 44 हजार 484 किलोलिटर डिझेल होती. ही विक्री जानेवारी ते मार्चमधील सरासरी विक्रीच्या बरोबरीने आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचा साठा पुरेसा असून ग्राहकांच्या बुकिंगनुसार डिलिव्हरी केली जात आहे. मात्र, सर्व ग्राहकांना सिलिंडर मिळावा यासाठी बुकिंगकरिता कालावधी दिला आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना 100 टक्के पुरवठा केला जात आहे. संरक्षण, रेल्वे, पोलिस, कारागृह आणि एसटी कँटीन 70 टक्के तर इतर निम-अत्यावश्यक क्षेत्रे आणि उद्योगांसाठी 20 टक्के पुरवठा केला जात आहे. स्थलांतरित मजुरांसाठी दररोज सुमारे 5 लिटरचे 27 हजार 600 सिलिंडर वितरित केले जात आहेत.
काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दक्षता पथके स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 8 मार्चपासून केलेल्या तपासणीत 21 सिलिंडर तर 3 हजार 628 गॅस कॅप्सूल / टँकर जप्त केले आहेत. या जप्त मुद्देमालाची किंमत 2 कोटी 38 लाख 54 हजार 493असून याप्रकरणी 36 जणांना अटक करण्यात आली आहे. एलपीजी वाहतूक, वितरण वाहने आणि गॅस एजन्सींना पोलिस संरक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.