

मुंबई : राज्याच्या वन विभागाकडून यंदाच्या पावसाळ्यात 10 कोटींचे लक्ष्य असताना केवळ 5 कोटी 32 लाख वृक्ष लागवड झाली आहे. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पावसाळ्याचे दिवस शिल्लक असताना उर्वरित लक्ष्य कसे पूर्ण करायचे, अशी चिंता वनविभागाला पडली आहे.
राज्यातील वन आच्छादन (ग्रीन कवर) 21.25 टक्क्यांवरून 33 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा उद्देश ठेवून हे अभियान राबवले जात आहे. यासाठी या वर्षीच्या पावसाळ्यात 10 कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शासनाने सर्व विभागांना आपापले लक्ष्य दिले असून, लावलेली झाडे वन विभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदवणे बंधनकारक आहे.
वृक्षारोपण अभियानांतर्गत राज्यातील मोकळ्या जागेत झाडे लावण्यात आली आहेत. या अभियानात मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर हे जिल्हे आघाडीवर आहेत, तर पुणे, नागपूर, जालना, यवतमाळ, सिंधुदुर्ग, सांगली, भंडारा हे जिल्हे मागे आहेत.राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त मुंबई शहरानेच आपले लक्ष्य 100 टक्के पूर्ण केले आहे, तर सात जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपणाचे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार, राज्यात 4 कोटी 32 लाख 80 हजार झाडांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे, तर सुमारे 1 कोटी झाडांचा ऑफलाईन डेटा उपलब्ध झाला आहे. इंटरनेट व इतर तांत्रिक अडचणींमुळे काही दुर्गम भागांत ऑफलाईन वृक्षारोपण नोंदी अद्याप ऑनलाईन करण्यात विलंब होत असल्याची माहिती एका अधिकार्याने दिली.
यावर्षी वन विभागाच्या नर्सरीत 2 कोटी रोपे उपलब्ध होती. त्यांचा वापर करण्यात आला आहे, तर इतर विभागांना खासगी नर्सरीतून रोपे खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पावसाळा संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबरअखेरपर्यंतच वृक्षारोपण अभियान सुरू राहणार असल्याचेही वन विभागाच्या अधिकार्याने बोलताना सांगितले.
कुठे किती वृक्ष लागवड केली
मुंबई 9 हजार 234
मुंबई उपनगर 15 हजार 75
ठाणे 7 लाख 53 हजार 308
पुणे 10 लाख 87 हजार 519
नागपूर 10 लाख 57 हजार 828
छत्रपती संभाजीनगर 9 लाख 36 हजार 330
अहिल्यानगर 28 लाख 69 हजार 470
सांगली 3 लाख 28 हजार 785