Crop Damage Due To Floods | अतिवृष्टी, पुरामुळे राज्यात 62 लाख एकर क्षेत्र बाधित

30 जिल्ह्यांत 195 तालुक्यांतील 654 महसूल मंडलांना फटका
maharashtra floods 62 lakh acres affected
Crop Damage Due To Floods | अतिवृष्टी, पुरामुळे राज्यात 62 लाख एकर क्षेत्र बाधितPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला असून, हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. पावसाच्या अस्मानी संकटामुळे 30 जिल्ह्यांमधील 195 तालुक्यांतील तब्बल 62 लाख 17 हजार 540 एकर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांत पाहणी दौरे करत असून, अधिकार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री दत्तात्रय भरणे हे नागपूर दौर्‍यावर असून, तेथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन वाहून गेल्याने पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांतील 195 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडलांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

खरीप पिकांचे मोठे नुकसान

यात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत, असे सांगतानाच महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे केले जात आहेत. तसेच, संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री दौरे करून शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करीत असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, त्यांना निश्चितपणे शासनामार्फत मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे एकूण बाधित जिल्हे

नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news