FDA Food Safety Action: नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई; ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित

सणासुदीच्या तपासणीत ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणांत २२ गुन्हे दाखल आणि २० जणांना अटक
FDA Food Safety Action
FDA Food Safety ActionPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवत सुमारे १२.७४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निकृष्ट, संभाव्य भेसळयुक्त आणि चुकीचे लेबल असलेला अन्नसाठा, मुदतबाह्य पदार्थ तसेच शीतगृहांतील साठ्यावर कारवाई करण्यात आली.

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या प्रकरणांत २२ गुन्हे दाखल करून २० जणांना अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या सात विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. अन्नपदार्थांची गुणवत्ता, संभाव्य भेसळ, चुकीचे लेबलिंग आणि स्वच्छतेच्या नियमांची तपासणी करण्यात आली.

FDA Food Safety Action
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोची उड्डाणे; फेब्रुवारी २०२७ पासून सेवेला सुरुवात

मुदतबाह्य अन्न पुन्हा बाजारात आणण्याचा संशय

ठाणे आणि पुणे जिल्ह्यांत विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आलेले मुदतबाह्य, खराब आणि नाकारलेले अन्न नष्ट न करता पुन्हा बाजारात आणले जात असल्याच्या संशयावरून तपासणी करण्यात आली.

या कारवाईत ८,३९२ किलो अन्नसाठा आढळून आला. त्याची किंमत सुमारे ४८.०९ लाख रुपये आहे. संबंधित कंपन्यांकडून अन्नाची विल्हेवाट लावल्याचा संपूर्ण आणि पडताळणीयोग्य तपशील उपलब्ध झाला नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या प्रकरणांत पाच परवाने निलंबित करण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

FDA Food Safety Action
28000 Crore Cyber Fraud: २८ हजार कोटींची सायबर फसवणूक; वकिलाला मुंबई विमानतळावर अटक

गुटख्याविरोधातही कारवाई

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधातील कारवाईत वाहनांसह सुमारे ३.१५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील मनोर येथे ट्रकमधून प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. जालना, मुंबई, नाशिक आणि धाराशिव जिल्ह्यांतही कारवाई करण्यात आली. या प्रकरणांत २२ गुन्हे दाखल करून २० जणांना अटक करण्यात आली.

अस्वच्छतेमुळे परवाने निलंबित

तपासणीदरम्यान अस्वच्छ स्वयंपाकगृहे, ड्रेनेजची खराब व्यवस्था, झुरळे व उंदरांचा प्रादुर्भाव, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची एकत्रित साठवणूक, अनधिकृत खाद्यरंगांचा वापर आणि कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव अशा त्रुटी आढळल्या.

याप्रकरणी ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर सात आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. चार आस्थापनांकडून अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत एकूण १.३० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने गोदामे, शीतगृहे, उत्पादन केंद्रे आणि खाद्य आस्थापनांची तपासणी सुरूच राहणार आहे.

राज्यभरात अन्नसुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

दोन शीतगृहांतील ४.१९ कोटींचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन शीतगृहांवर कारवाई करून १ लाख ९७ हजार ४८० किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे ४.१९ कोटी रुपये आहे. या साठ्यात मिरची पावडर, मनुका, गूळ आणि पाश्चराइज्ड बटरचा समावेश आहे. दोन्ही शीतगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले.

राज्यभरात निकृष्ट, संभाव्य भेसळयुक्त आणि चुकीचे लेबल असलेला ३ लाख ७४ हजार ७६२ किलो तसेच २८ हजार २९७ लिटर अन्नसाठा जप्त किंवा नष्ट करण्यात आला. त्याची किंमत सुमारे ९.११ कोटी रुपये आहे. खाद्यतेल, मसाले, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, फरसाण, चहा आणि सुकामेवा यांचा त्यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news