

मुंबई : हेल्थ सप्लिमेंट, विशेष आहार आणि न्यूट्रास्युटिकल उत्पादनांच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्या, विक्रेते व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्पादनांच्या विक्री व जाहिरातींसाठी असलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उत्पादक, आयातदार, पुरवठादार, वितरक, किरकोळ विक्रेते, औषध विक्रेते, व्यायामशाळा व हेल्थ सेंटर यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न परवाना नसताना अशा उत्पादनांची विक्री करता येणार नाही, असा इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
आजकाल अनेक युवक डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला न घेता हेल्थ सप्लिमेंट व न्यूट्रास्युटिकल्सचे सेवन करतात. सोशल मीडियावरील जाहिरातींतून वजन कमी होणे, चेहऱ्यावर ग्लो येणे, लैंगिक क्षमता वाढणे किंवा विविध आजार बरे होण्याचे दावे केले जातात. मात्र, अशा उत्पादनांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या उत्पादनांच्या निर्मितीपासून विक्री आणि जाहिरातींपर्यंतच्या संपूर्ण साखळीवर एफडीए लक्ष ठेवणार आहे.
सप्लिमेंट म्हणजे औषध नव्हे
हेल्थ सप्लिमेंट हे नेहमीच्या आहाराला पूरक असते. शरीरातील कोणतीही कमतरता दूर करण्यासाठी किंवा आजार बरा करण्यासाठी ते औषध म्हणून वापरता येत नाही. विशेष वैद्यकीय आहार हा विशिष्ट आजार असलेल्या रुग्णांच्या आहार व्यवस्थापनासाठी असतो. त्याचा वापर वैद्यकीय देखरेखीखाली करणे आवश्यक आहे. या दोन्ही उत्पादनांचे स्वरूप व उपयोग वेगवेगळे असताना त्याबाबत चुकीचे दावे करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक व पोस्ट-बायोटिक घटकांचा वापर करताना अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. उत्पादनात वापरलेल्या वनस्पतीचा कोणता भाग वापरला आहे, याची माहिती लेबलवर देणे आवश्यक आहे. उत्पादनातील घटकांनुसार आवश्यक इशारेही नमूद करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक उत्पादनांच्या लेबलवर ही माहिती नसल्याचे आढळले आहे.
विक्रीसाठी अन्न परवाना बंधनकारक
उत्पादक, आयातदार, वितरक आणि साठा करणाऱ्यांसह औषध दुकाने, जिम, हेल्थ सेंटर आणि रुग्णालयांनाही ही नियमावली लागू आहे. अन्न परवान्याशिवाय अशा उत्पादनांची विक्री करता येणार नाही. औषध स्वरूपातील उत्पादनांबाबत कायद्यानुसारही कारवाई केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.
'डॉक्टरांनी शिफारस केली' असा खोटा दावा केल्यास कारवाई
उत्पादनाच्या जाहिरातीत 'डॉक्टरांनी शिफारस केलेले' असे खोटे दावे करणे, तसेच वजन कमी होते, त्वचेवर चमक येते किंवा आजार बरा होतो, अशी दिशाभूल करणारी माहिती देणे यापुढे महागात पडणार आहे. अशा जाहिराती करणाऱ्या इन्फ्लुएन्सरनाही नोटिसा बजावण्यात येणार आहेत. संबंधितांना म्हणणे मांडण्याची संधी दिल्यावर नियमभंग सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
६ नोव्हेंबरला १.३८ कोटींचा साठा जप्त
हेल्थ सप्लिमेंट आणि संबंधित उत्पादनांविरोधात राज्यात आतापर्यंत १७ कारवाया करण्यात आल्या आहेत. ६ नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत १ कोटी ३८ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. काही उत्पादनांमध्ये घोषित नसलेले घटक आढळल्याचेही मुंढे यांनी सांगितले. नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा उत्पादनांचे सेवन करू नये, असे आवाहन त्यांनी केले.