Maharashtra Drought : दुष्काळी यादीत नसलेल्या तालुक्यांची तपासणी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

‘मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही’
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavispudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर-३ अंतर्गत मदत देण्यात येईल, दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात नागपुरात माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले. कमी पाऊस झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये १२ उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकाच्या नुकसानीची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून दिली जाईल. ज्या तालुक्यांचा या यादीत समावेश झाला नाही अशा सर्व तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर-३ मध्ये असे तालुके समाविष्ट केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबद्दल बोलताना ते म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येईल. राज्यातील बहुतांश प्रकल्पात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. येत्या जुलै-ऑगस्टपर्यंत लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून अतिरिक्त पाणी रब्बीच्या पिकांसाठी देता येईल का, याचाही प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना जनतेनेही सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना फडणवीस यांनी अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागांमध्ये कशी मदत करता येईल, ती सर्वांनी करावी, असे आवाहनही केले. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे छत्तीसगडमध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर परिस्थितीमध्ये प्रशासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news