

मुंबई : Eknath Shinde | राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्राधिकरणाच्या नियमात बदल करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरुस्ती करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नव्या रचनेनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष आणि नऊ सदस्य असतील. त्यामध्ये मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, उपमुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असतील; तर अन्य पदसिद्ध सदस्य पदाकरिता मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इतर मंत्र्यांना नामनिर्देशित करतील. यापूर्वीच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या रचनेत उपमुख्यमंत्र्यांचा समावेश नव्हता. २०१९ च्या रचनेनुसार मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असत. तर महसूल, वित्त, गृह, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य हा विभागांचे मंत्री हे सर्व पदसिद्ध सदस्य होते. याशिवाय अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेले आपत्ती धोके कमी करण्याचे ज्ञान व अनुभव असलेले तीन अशासकीय सदस्य आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानुसार मागील आठवड्यात मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने मकरंद पाटील, आरोग्यमंत्री या नात्याने प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ओघानेच या रचनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव बसत नव्हते. त्यामुळे प्राधिकरणात शिंदे यांना डावलले गेल्याची चर्चा उद्भवली आणि शेवटी शिंदे यांच्यासाठी नियम बदलावा लागला.
या प्राधिकरणावर मुख्यमंत्र्यांच्या शिवाय वित्तमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री, आरोग्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री असे सहा जण असतात. साहजिकच या प्राधिकरणाची पुनर्रचना करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आले नव्हते. यावरून राजकीय गदारोळ झाला. परिणामी शिंदे यांना प्राधिकरणावर घेण्यासाठी नियम बदलण्यात आला असून त्यानुसार मुख्यमंत्री हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य असतील.
मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजीचे पडसाद उमटले. मंत्रिमंडळ बैठकीच्या विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर सर्व सचिवांना बैठकीबाहेर जाण्यास सांगण्यात आले. मग जवळपास १५ मिनिटे बंद दाराआड याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विशेषतः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरूनही बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.