

मुंबई : राज्यातील विविध धरणांमध्ये सध्या सुमारे 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. मात्र, यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे अनियमित पाऊस तथा संभाव्य पाणीटंचाईची शक्यता आहे. त्याचा मुकाबला करता यावा यासाठी पाणी जपून वापरा. ऑगस्टअखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि ‘अल निनो’ प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली. राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट 2026 अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यंदा 101.77 टीएमसी अधिकचा पाणीसाठा
‘अल निनो’च्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात 2014 मध्ये 12 टक्के, तर 2015 मध्ये सुमारे 14 टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. 15 ऑक्टोबर 2014 रोजी 872 टीएमसी, तर याच दिवशी 2015 मध्ये 625 टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत 2025 मध्ये 15 ऑक्टोबरला 1,330.97 टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा 21 एप्रिल 2026 रोजी 653.63 टीएमसी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 101.77 टीएससी पाणीसाठा अधिकचा आहे.