

मुंबई : जगात सायबर गुन्हेगारी पहिल्या क्रमांकावर असून या गुन्हेगारांनी सहा ट्रिलियन डॉलर लुटले आहेत. याच वर्षी सायबर गुन्हेगारांनी ठगवलेले राज्यातील 600 कोटी रुपये महाराष्ट्र सायबर सेलने सील केले आणि जनतेला परत देखील केले. कारण, महाराष्ट्राचा सायबर सेल हा जगात सर्वांत सक्षम आहे, अशी नोंद सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केली. सायबर फसवणूक झाल्यास रामबाण उपाय म्हणून तातडीने 1945 आणि 1930 या सायबर पोलीस क्रमांकांवर तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुढारी न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित महासमिट-2025 मध्ये ‘सायबर गुन्हे’ या विषयावर सायबर सेलचे विशेष महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सायबर गुन्हेगारी का होते आणि ती कशी रोखता येईल, याबाबतची सद्यस्थितीची मांडणी केली. पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी यांनी त्यांना बोलते केले. यशस्वी यादव पुढे म्हणाले, जगात संघटित सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत असून या गुन्हेगारीने ड्रग्ज, नार्को ट्रॅफिकिंग या गुन्हेगारीला मागे टाकले आहे. त्यांना रोखण्यास सायबर सुरक्षा तेवढी सक्षम नाही. कारण, आपल्याकडे सायबर सुरक्षा जागृतीच नाही. त्याचे नागरिकांना प्रशिक्षणच दिले जात नसल्याने लोकांची फसवणूक होत असल्याचे यादव यांनी सांगितले.
देशभरात सायबर सुरक्षा शिक्षण अभियान चालविण्याची गरज आहे. असे प्रशिक्षण परदेशात चालते. या गुन्ह्यांमध्ये सुशिक्षित लोक सहभागी असून एका हैदराबादच्या एमबीए झालेल्या तरुणाने 51 मुलींना एकाचवेळी कसे फसविले याचे उदाहरण दिले. एका वैद्यकीय शिक्षण घेणार्या मुलीने त्या सायबर गुन्हेगाराच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली. ते दोघेही कधीच एकमेकांना समोर भेटले नाहीत. फक्त सोशल मीडियामधून चॅटिंग होऊन तिची पिळवणूक होत राहिली. तिने अकाउंट बंद केले; मात्र पुन्हा तो आरोपी तिला शोधून काढत सोशल माध्यमातून तिची पिळवणूक करीत होता. त्यातून ती नापासही झाली. निराशेपोटी तिने आत्महत्या केली. तिच्या आई-वडिलांना संशय आल्याने पोलिसांनी हे प्रकरण तडीस नेले आणि आरोपीला जेरबंद केले. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत जागरूकता हवी, असे विशेष महानिरीक्षक यादव यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सायबर सेल हा जगातील सर्वांत सक्षम सेल असून त्यांनी उत्तम यंत्रणा उभारली आहे. कुठलीही सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांनी तातडीने 1945 आणि 1930 या क्रमांकांवर एक कॉल केल्यास तातडीने अकाऊंट फ्रीज करून आर्थिक फसवणूक रोखली जाते. महाराष्ट्र सायबर सेलने सर्व बँकांशी करार केला असून आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांचा मेल येताच संबंधित खातेधारकाचे अकाऊंट बँक बंद करते आणि त्यांच्या खात्यातून पैसे गुन्हेगार काढू शकत नाही, तरीदेखील यावर्षी 600 कोटींची फसवणूक झाली आणि ते पैसे अकाऊंटमध्ये फ्रिज करून नागरिकांना परत देण्यात सायबर पोलीस यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. रामबाण उपाय म्हणून लोकांना सायबर प्रशिक्षण देणे, वर्षातून एकदा सायबर सिक्युरिटी ऑडिट करणे आणि लोकांमध्ये जागृती वाढवणे हेच महत्त्वाचे आहे, असे यादव यांनी सांगितले.
सायबर गुन्हेगारी ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर होत आहे. या गुन्हेगारी विश्वात क्रिप्टो चलनाचा वापर केला जातो आणि डार्कनेस विश्वाचा वापर केला जातो. इंटरनेट, ड्रग ही याची कारणे आहेत. विदेशातून गुन्हेगार येऊन भारतात हत्या करून जातो. त्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी भारताच्या गृह खात्याने क्रिप्टो चलन आणि डार्कनेसवर बंदी घालण्याची मागणी केली असल्याचे यादव यांनी सांगितले.
भारतात 70 कोटी लोक स्मार्ट फोन वापरतात. प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आहे; मात्र त्यांना स्मार्ट फोन कसा वापरावा, याची माहिती नाही. त्यांना पासवर्ड कसा ठेवावा, याची माहिती नाही, जेणेकरून सायबर गुन्हेगार हा पासवर्ड डीकोड करू शकणार नाही. मोठ्या -मोठ्या कंपन्यांमध्ये सायबर सिक्युरिटी ऑडिटच केले जात नाही. त्यामुळे त्यांचा डाटा चोरी होत असतो. आपण डिजिटल एजवर स्वार झालो असून तंत्रज्ञानाचे शिक्षणच घेत नाही. आपल्याकडे ज्याप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट घेतली जाते, तशी सायबर सिक्युरिटी टेस्ट व्हायला हवी, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली.