

मुंबई ः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा समावेश कार्यकारिणीत होईल, असे सांगितले जात होते पण मंगळवारी प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर झाली असून त्यात पुन्हा जुन्याच नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सुमारे 300 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जेवढे नेते काँग्रेसमध्ये सध्या आहेत त्यांना कोणत्या ना कोणत्या पदांवर नेमण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी म्हणून रमेश चेन्निथला यांना कायम ठेवण्यात आले आहे. चेन्निथला यांच्या नेतृत्त्वाखाली 36 नेत्यांचा समावेश असलेली मुख्य समिती जाहीर करण्यात आली आहे.
विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, रजनी पाटील, नाना पटोले आदी नेत्यांचा समावेश आहे. अभय छाजेड यांची खजिनदारपदावर नियुक्ती केली आहे. प्रज्ञा सातव, मोहन जोशी, रमेश बागवे, कल्याण काळे, अनिस अहमद आदी नेत्यांची वरिष्ठ उपाध्यक्ष या पदावर नेमणूक केली आहे, तर 38 नेत्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
अनंत गाडगीळ, अतुल लोंढे, सचिन सावंत , गोपाळ तिवारी, धीरज देशमुख यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. 108 जणांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. यात काही तरुण चेहरे असून त्यात श्रीकृष्ण सांगळे यांचा समावेश आहे. सचिव म्हणून 95 जणांची नेमणूक केली आहे. कार्यकारी समितीत 87 जणांचा समावेश आहे. याबरोबर रणजित देशमुख (सातारा), दिप चव्हाण (अहिल्यानगर), पूनम पाटील ( नवी मुंबई) सुरेश सराफ, ( हिंगोली) यांसह 13 जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले आहेत.