

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत असून त्यांना या पदावर मुदतवाढ देण्याबाबत कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला नाही. त्यामुळे ते ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त होतील आणि त्यांच्या जागी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांची नियुक्ती होणार असल्याचे समजते.
राजेश अग्रवाल हे ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार असले तरी त्यांना अद्याप मुदतवाढ देण्याबाबत कोणतेही विनंतीचे पत्र राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेले नाही. त्यामुळे राजेश अग्रवाल यांना निवृत्तीसाठी चार दिवस उरले आहेत. त्यांना मुदतवाढ मिळेल अशी शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे मुख्य सचिवपदासाठी मनीषा म्हैसकर या प्रबळ दावेदार असून त्यांची नियुक्ती १ डिसेंबरला होईल, असे सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून सांगण्यात आले.
म्हैसकर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्या मर्जीतील सनदी अधिकारी म्हणून बोलले जात होते. मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी म्हैसकर या इच्छुक होत्या. पण मुख्य सचिवपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजी आहेत.
मनीषा पाटणकर म्हैसकर या १९९२ च्या सनदी अधिकारी आहेत. म्हैसकर या मुख्य सचिव बनल्या, तर त्या राज्याच्या दुसऱ्या महिला मुख्य सचिव असतील. तसेच दोन वर्षांहून अधिक कालावधी मिळेल.