

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी 2025 परीक्षेचा निकाल दोन टप्प्यांत जाहीर होणार आहे. सोमवारी (16 जून) पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटाचा, तर मंगळवारी (17 जून) पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटाचा निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणार्या विविध अभ्यासक्रमांपैकी महत्त्वाची परीक्षा असलेल्या एमएचटी-सीईटीच्या निकालाची तारीख यापूर्वीच जाहीर केली आहे. आता मात्र सीईटी सेलने दोन टप्प्यात जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
9 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान पीसीबी गट आणि 19 एप्रिल ते 5 मे 2025 दरम्यान पीसीएम गट अशी दोन टप्प्यात 28 सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. यामध्ये पीसीबी गटासाठी 3 लाख 1 हजार 72 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 82 हजार 737 उमेदवार परीक्षेला बसले होते. त्याचप्रमाणे पीसीएम गटासाठी 4 लाख 64 हजार 263 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 लाख 22 हजार 863 उमेदवार परीक्षेला बसले होते. एमएचटी सीईटीची परीक्षा 181 केंद्रांवर घेण्यात आली. त्यातील 172 केंद्रे राज्यात होती, तर नऊ केंद्र राज्याबाहेर होती.
एमएचटी-सीईटी 2025 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी पीसीबी गटातील उमेदवारांसाठी 18 मे 2025 रोजी आणि पीसीएम गटासाठी 21 मे रोजी सूचनेद्वारे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेप नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
निकाल कुठे पाहता येणार?
पीसीएम व पीसीबी या दोन्ही गटाचे निकाल हे www.mahacet.org आणि www.mahacet.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये जाहीर करण्यात येणार आहेत.