

पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Budget 2025 | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सोमवारी (दि. १०) राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ विधानसभेत सादर केला. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी दरम्यानच्या ७६० किलोमीटर लांबीच्या, ८६ हजार ३०० कोटी रुपये किंमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल.
मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जातील. बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ किलोमीटर असून त्याचे सुमारे ३ हजार ३६४ कोटी रुपये खर्चाचे काम २०२८ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे १४ किलोमीटर लांबीचे, १८ हजार १२० कोटी रुपये खर्चाचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा ५५ किलोमीटर लांबीचा ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
पूर्वनिर्धारित निकषांवर आधारित राज्याचा दीर्घकालीन व सर्वसमावेशक “अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा २०२५ ते २०४७” तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या आराखडयामध्ये पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळं, गडकिल्ले, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, ५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या वसाहती आणि सर्व जिल्हा मुख्यालये व तालुका मुख्यालये जोडण्याकरता रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा-१ पूर्ण झाला आहे. टप्पा- २ मधील ३ हजार ९३९ कोटी रुपये किंमतीची ४६८ किलोमीटर रस्ते सुधारणांची कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी ३५० किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत.
टप्पा-३ अंतर्गत ७५५ किलोमीटर रस्ते लांबीची ६ हजार ५८९ कोटी रुपये किंमतीची २३ कामे हाती घेण्यात आली आहेत. सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत ६ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांची किंमत ३६ हजार ९६४ कोटी रुपये आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -३ अंतर्गत ६ हजार ५०० किलोमीटर लांबीची, ५ हजार ६७० कोटी रुपये किंमतीची कामे मंजूर असून त्यापैकी ३ हजार ७८५ किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत.