

मुंबई : राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत 16 हजार 395 पूल आहेत. या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत 4 पूल हे अतिधोकादायक आणि 8 पूल धोकादायक असून त्यांची दुरुस्ती आणि बांधणीचे काम सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
दरम्यान, पुणे येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू असून या समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनाप्रकरणी आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावेळी मोहन तुपे, सुधीर मुनगंटीवार, अमोल खताळ, रोहित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी उपप्रश्न केले.
या चर्चेला उत्तर देताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल हा 30 वर्षे जुना होता. हा पूल धोकादायक होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबद्दलची माहिती जाहीर केली होती. त्याबद्दलचे फलकही लावण्यात आले होते. त्यानंतरही पर्यटक या पुलावर आले होते. त्यादिवशी पर्यटक जास्त आल्यामुळे पूल कोसळला. ही घटना दुर्दैवी असून त्यात 4 जणांचा मृत्यू होणे ही बाब गंभीर आहे. दरम्यान, राज्यभरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना करण्यात आली असून अहवालानंतर संबंधित पुलाची दुरुस्ती करायची किंवा नवीन बांधायचे, हे ठरविण्यात येणार आहे. या धोकादायक पुलाचा पर्यटकांनी वापर करू नये, यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यात दिरंगाई झाल्याचे समोर आले आहे. यात अनेक कारणे असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता हेसुद्धा एक कारण आहे. त्याशिवाय रांजण खळगे पात्रात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या सर्व प्रकरणाच्या तपासासाठी सचिव स्तरावरील त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. 15 दिवसांत समितीला अहवाल देण्याची सूचना करण्यात आली असून त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही भोसले यांनी यावेळी जाहीर केले.