पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी (दि. २४) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. उद्याचा बंद सर्व नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून दुपारी २ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. हा बंद राजकीय कारणासाठी नाही, तरी सर्व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. २३) पत्रकार परिषदेत केले.
ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी आम्हाला विरोधक बोलतात. तर आम्ही विकृतीला विरोधक मानत आहे. उद्याचा बंद विकृती विरूद्ध संस्कृती असा आहे. बदलापुरातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत. जाती, पाती, धर्म, पक्षासाठी नाही, तर सर्वांच्या कुटुंबियासाठी बंदमध्ये सहभागी व्हावे. यंत्रणांकडून चुकीची कामे होत आहेत. बंदमध्ये महाराष्ट्रातील नागरिक सहभागी होतील, सरकार अकार्यक्षम असेल. पण जनता मात्र सक्षम आहे. उच्च न्यायालयाने सरकारला झापले आहे. न्यायालयाने बदलापूरची घटनेची घेतलेली दखल राजकीय आहे का ? असा सवाल ठाकरे यांनी सरकारला यावेळी केला. बंद आड पोलिसांनी दादागिरी करू नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले. माता बहिणीपेक्षा व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय महत्वाचा वाटू न घेता बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.