

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 updates
मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटीनमधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण आणि मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेल्या बॅगेसोबत (Sanjay Shirsat Bag Video) व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ विरोधी आमदारांनी बुधवारी (दि. १६ जुलै) विधानभवन पायऱ्यावर बनियन आणि टॉवेल लावून निर्दशने केली. यावेळी त्यांनी चड्डी, बनियन गँगच्या घोषणाही दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ''गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात कायद्याची भीती, धाक राहिला नाही. स्वतः कायदा हातात घेतात. भ्रष्टाचार करतात. या सर्वांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होते. सरकार आमच्या बापाचे आहे असे ते समजतात का,'' असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले.
सतेज पाटील म्हणाले की, पैशाची बॅग दिसूनसुद्धा कारवाई केली जात नाही. याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे. कपड्यांची बॅग होती तर मग चौकशी झाली पाहिजे. या सुरू असलेल्या गुंडगिरी आणि गोरगरीबांना मारहाण करणाऱ्या चड्डी बनियान गँगच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.