

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव आज मंत्री जयकुमार रावल यांनी आज सोमवारी विधानसभेत मांडला. भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत मांडलेल्या या ठरावाला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. दरम्यान, हा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
दरम्यान, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या वसतिगृहांसाठी पंधराशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत सांगितले. तर राज्यातल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा दत्तक योजना राबवली जात आहे. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद तसेच मराठी शाळा बंद होण्याचा प्रश्न नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसले यांनी सांगितले.
राज्यातल्या शाळा दुरुस्तीचा आराखडा लवकरच तयार करू आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करू, असे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिले.