School van recognition : राज्यात आता 12 आसनी ‘स्कूल व्हॅन’ला मान्यता

मोटार वाहन नियमात बदल, अनधिकृत स्कूल व्हॅन होणार अधिकृत
School van recognition
राज्यात आता 12 आसनी ‘स्कूल व्हॅन’ला मान्यताpudhari photo
Published on
Updated on

मुंबई: राजन शेलार

परिवहन विभागाने 12 आसनांपर्यंत क्षमता असलेल्या, विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी डिझाईन केलेल्या आणि बांधलेल्या आहेत, अशाच वाहनांना ‘स्कूल व्हॅन’ म्हणून मान्यता दिली आहे. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास संबंधित वाहनांवर कारवाई होणार आहे. यासाठी परिवहन विभागाने मोटार वाहन नियमामध्ये बदल करून अधिसूचना जारी केली आहे.

राज्यात 1 लाख 8 हजार शाळा असून यामध्ये सरकारी आणि खासगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी स्कूल व्हॅन आणि स्कूल बसेस धावत आहेत. राज्यभरात अशा सुमारे एक लाखांहून अधिक लहान स्कूल व्हॅन आणि 40 हजार स्कूल बसेस आहेत. यापैकी 50 टक्के स्कूल व्हॅन मुंबई महानगर प्रदेशात धावत आहेत. मात्र, स्कूल बसेसचा अपवाद वगळल्यास राज्यात स्कूल व्हॅन अनधिकृतपणे धावत आहेत. त्या पार्श्वभूमिवर परिवहन विभागाने महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बसेसचे नियमन) नियम 2011 मध्ये बदल करून स्कूल बसेस आणि स्कूल व्हॅनची व्याख्या करणारी अधिसूचना जारी केली आहे. नव्या नियमातून अनधिकृत स्कूल व्हॅनला अधिकृत करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा परिवहन विभागात आहे.

शालेय बसेसच्या नियमानुसार ‘स्कूल बस’ म्हणजे तेरा आणि त्याहून अधिक विद्यार्थ्यांची बसण्याची क्षमता असलेले वाहन आणि ‘स्कूल व्हॅन’ म्हणजे बारा विद्यार्थ्यांपर्यंत बसण्याची क्षमता असलेले वाहन म्हणून ओळखले जाणार आहे. हे वाहन विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेले आणि बांधलेले असेल आणि विशेषत: सरकारी संस्थांद्वारे या वाहनांना मंजुरी दिली जाईल. या वाहनांवर ‘स्कूल व्हॅन’ असे लिहावे लागणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षा नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निरोधक यंत्रणा, अ‍ॅल्युमिनियमची जाळी, खिडक्या असणे आवश्यक असून व्हॅनमधील बसण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन जाता येणार नाही. तसेच या वाहनांमधून विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना घेऊन प्रवास करता येणार नाही, अशी माहिती परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

स्कूल बसला ठरणार पर्याय

12 आसन क्षमतेपर्यंतच्या वाहनांना मान्यता दिल्याने याचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. स्कूल बसेस या फक्त मुख्य रस्त्यावरून ते थेट शाळेपर्यंत जातात. परंतु, व्हॅन या अरुंद रस्त्यावरून सहज धावत विद्यार्थी राहत असलेल्या घराच्या ठिकाणाहून त्यांना शाळेत घेऊन जातात आणि पुन्हा घरांपर्यंत सोडतात. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असलेल्या दिवशी स्कूल बसेस रस्त्यावर उभ्या असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. ही कोंडी लहान स्कूल व्हॅनमुळे टळेल, असा विश्वास अधिकार्‍याने व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news