महाराष्ट्र-द. कोरिया भागीदारीतून कौशल्य विकास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऐतिहासिक करारांमुळे युवकांना जागतिक दर्जाच्या संधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार करण्यात आले.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार करण्यात आले.
Published on
Updated on

मुंबई : नवीन युगातील उद्योग, व्यवसाय आणि कौशल्य विकासामध्ये दक्षिण कोरियाने जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र व दक्षिण कोरियात झालेल्या सामंजस्य सहकार्यामुळे कोरियाचे उत्कृष्ट कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञान भारतात येईल, ज्याचा थेट फायदा भारतीय विद्यार्थ्यांना होणार आहे. या कराराच्या माध्यमातून मूलभूत औद्योगिक कौशल्यांपासून ते उच्चस्तरीय प्रगत कौशल्यांपर्यंत सर्व स्तरांवरील प्रशिक्षणासाठी मदत होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि दक्षिण कोरियाच्या कोरिया पॉलिटेक्निक्स, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि दक्षिण कोरियाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाईफलाँग एज्युकेशन, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित संस्थेच्या दोन शाखांमध्ये असे एकूण तीन सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताच्या लोकसंख्येचा आणि तरुण पिढीच्या नावीन्यतेचा फायदा देशाच्या विकासासाठी करून घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताला मोठ्या भौगोलिक आणि लोकसंख्येचा फायदा मिळाला आहे. देशाची जवळपास 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील असून, हा वयोगट आपली खरी ताकद आहे. या वयोगटातील नावीन्यतेचे ‘मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे आपले मुख्य ध्येय आहे. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याची अर्थव्यवस्था सध्या 660 अब्ज डॉलर्सची असून, ती लवकरच 1 ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.

‘लाईफलाँग लर्निंग’ला चालना

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि दक्षिण कोरियाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाईफलाँग एज्युकेशन यांच्यात झालेल्या कराराचा मुख्य उद्देश महाराष्ट्रासाठी ‘लाईफलाँग लर्निंग’ अर्थात आयुष्यभर शिक्षण आणि कौशल्य वृद्धीचे व्यापक धोरण तयार करणे हा आहे. यासाठी डिजिटल शिक्षण आणि प्रमाणपत्र प्रणाली विकसित केली जाणार आहे. जानेवारी 2027 ते जून 2028 या कालावधीत या कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल.

उच्च शिक्षणाची जागतिक संधी

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित कैस्टा संस्थेच्या दोन शाखांमध्ये झालेल्या कराराचा केंद्रबिंदू शाश्वत विकास आणि डिजिटल इनोव्हेशन हा आहे. या करारामुळे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे निवडक प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी कैस्टामध्ये मास्टर्स आणि पीएच.डी. शिक्षण घेऊ शकणार आहेत.

महाराष्ट्रात उभारणार ‘लर्निंग फॅक्टरी’ मॉडेल

राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि दक्षिण कोरियाच्या कोरिया पॉलिटेक्निक्स यांच्यात झालेला करार राज्यातील तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या करारांतर्गत कोरियातील प्रसिद्ध ‘लर्निंग फॅक्टरी’ मॉडेलवर आधारित प्रगत प्रशिक्षण केंद्रे महाराष्ट्रात उभारली जाणार आहेत. मार्च 2027 ते जून 2028 दरम्यान ही केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news