

Advocate General Birendra Saraf resignation
मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील व्यवस्था होईपर्यंत काम पाहण्याची विनंती राज्य सरकारने त्यांना केली आहे. ती त्यांनी मान्य केली असून जानेवारीपर्यंत काम पाहण्यास होकार दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१६) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिली.
सराफ यांनी 25 वर्षे बॉम्बे उच्च न्यायालयात वकिली केली आहे. त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई येथून पदवी घेतली. ज्युनियर वकील म्हणून त्यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कक्षामध्ये काम केले आहे. 2000 मध्ये चंद्रचूड यांची बॉम्बे हायकोर्टचे न्यायाधीश म्हणून बढती झाल्यानंतर सराफ माजी महाधिवक्ता रवी कदम यांच्या चेंबरमध्ये दाखल झाले. सन 2020 मध्ये सराफ यांची वरिष्ठ वकिल म्हणून नियुक्ती झाली. सहा वर्षे त्यांनी बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून काम केले आहे.
त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल आणि वादग्रस्त प्रकरणे हाताळली आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बांद्रा येथील कंगना रणौत यांच्या मालमत्तेवर केलेल्या पाडकाम कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी कंगनाची यशस्वी बाजू मांडली. उच्च न्यायालयाने पाडकाम नोटीस रद्द केली.