Maha summit 2025 | महायुती-मविआचा मुंबईतील मित्रांबाबतचा संभ्रम उघड

महाधुरळा चर्चेत प्रवक्त्यांची चांगलीच कसरत
Maha summit 2025
मुंबई : मुंंबई कुणाची? या विषयावर चर्चा करताना डावीकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, मनसे नेते संदीप देशपांडे, काँग्रेस नेते सचिन सावंत, शिवसेना ठाकरे गटाचे हर्षल प्रधान, शिवसेना शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे, पुढारी मल्टिमीडिया राजकीय संपादक मृणालिनी नानिवडेकर. File Photo
Published on
Updated on

मुंबई : दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागतच आहे. मात्र, काही मुद्द्यांवर आमचे ठाम मतभेद असल्याची काँग्रेसची भूमिका. तर, महायुतीचा महापौर होणार या भाजपच्या दाव्यावर शिंदे गटाने आमच्याकडे 110 नगरसेवक असल्याचे सांगत मागे हटण्यास एका अर्थाने नकार दिला. युती, आघाडी करत सगळेच मुंबईत सत्तेवर आले. केवळ मनसेला संधी मिळाली नसल्याची खंत संदीप देशपांडेंनी बोलून दाखविली. तर, राजकीय पक्षांना बाजूला सारून मुंबईकरांनी नवे, स्थानिक नगरसेवक निवडूून आणावेत, अशी हाक अंजली दमानिया यांनी दिली.

‘मुंबई कुणाची?’ या विषयावर महाधुरळा हा चर्चेचा कार्यक्रम पार पडला. या चर्चेत मनसे नेते संदीप देशपांडे, शिवसेना ठाकरे गटाचे हर्षल प्रधान, भाजपचे नवनाथ बन, शिवसेना शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे, काँग्रेस नेते सचिन सावंत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, पुढारी मल्टिमीडिया राजकीय संपादक मृणालिनी नानिवडेकर यांनी सहभाग घेतला. तर, संवादकाचे कार्य नम्रता वागळे यांनी पार पाडले.

मुंबई कोणाची या प्रश्नावर भाजपच्या नवनाथ बन यांनी, मुंबई ही मराठी माणसाची, विकासाची, भ्रष्टाचार विरोधाची आणि सुरक्षित ठेवणार्‍यांची असल्याचे सांगितले. मागील निवडणुकीत पक्षाने 82 जागा जिंकल्या. यंदा मुंबईकरांच्या पूर्ण पाठिंब्याने महायुतीचाच महापौर बनणार असल्याचा दावा केला. मात्र, महायुतीच्या नेमक्या समीकरणाबाबत भाष्य करणे टाळले. तर, शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे तब्बल 114 माजी नगरसेवक, त्यातही 2017 साली निवडून आलेले 57 नगरसेवक आपल्या पक्षात असल्याचा दावा केला. त्यामुळे ठाण्याच्या बदल्यात मुंबई त्याग वगैरे करायला लावले जाईल, यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत भाजपला एकप्रकारे इशाराच दिला. मुंबई आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची असा नारा देतानाच बाळासाहेबांच्या विचारांवर चालणार्‍या शिवसेनेलाच जनतेची पसंती मिळेल, असेही म्हात्रे म्हणाल्या.

तर, मुंबईकरांच्या प्रत्येक अडचणीत शिवसैनिक मदतीसाठी धावून जातो. मुंबईकरांना हे चांगलेच माहीत आहे. ठाकरे या नावावर त्यांचा विश्वास आहे. आता सगळेच आम्ही सोबत आहोत, काँग्रेस आणि त्याचा मतदार ठामपणे ठाकरे गटाच्या मागे उभा आहे. मनसेशी सोबतही शेवटपर्यंत राहण्यासाठी असल्याचे ठाकरे गटाचे हर्षल प्रधान म्हणाले. ठाकरे गट आणि मनसेच्या युतीत औपचारिकताच बाकी असल्याचे प्रधान यांनी सूचित केले. तर, ठाकरे बंधूंच्या युतीसाठीचे वातावरण असले तरी जोपर्यंत राज ठाकरे घोषणा करत नाहीत तोवर ती बाब आम्ही मानत नाही, असे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे अधोरेखित केले. शिवाय, 25 वर्षांपासून शिवसेना-भाजप एकत्र होते. त्याआधी काँग्रेस सत्तेत राहिली. पण, मुंबईकरांना आजही त्याच प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. हत्ती, कबुतरांवर चर्चा करतो, पण खर्‍या मुद्द्यांवर कधी बोलणार का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला. तर, ठाकरे बंधूंच्या एकीकरणाला भावनिक पाठिंबा असला तरी मनसेबाबत आमचे काही मतभेदाचे मुद्दे कायम असल्याचे काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढचा निर्णय त्यांनी घ्यावा, असे सांगत काँग्रेसची स्वबळाची तयारी असल्याचेही सुनावले. त्याचवेळी नालेसफाई, रस्ते, कचरा, पाणीपुरवठा याच विषयांवर मुंबईची चर्चा फिरते आहे. या आंतरराष्ट्रीय शहराला तशा दर्जाचे व्यवस्थापन देण्यात महायुती अपयशी ठरल्याचेही सावंत म्हणाले.

तर, कोण युतीत आहे आणि कोण नाही हेच समजत नसून संभ्रमाचे वातावरण असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. गेली काही वर्षे प्रशासनाने मुंबई चालविली. त्यामुळे राजकीय पक्षांची कितपत गरज हा प्रश्न आहेच. त्यामुळे मुंबईकरांनी यंदा या पक्षांना बाजूला ठेवत आपापल्या भागात स्थानिक पातळीवर नव्या लोकांना समोर आणावे, तरच राजकीय पक्ष सुधारतील. राजकीय पक्षांशिवायच ही निवडणूक झाली पाहिजे, अशी भावना अंजली दमानिया यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news