

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नगर विकास विभागाने महापालिका, नगरपालिका तसेच नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले. या आदेशानुसार मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या 10 अ, ब, क वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील ड वर्गातील19 महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत.
मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आधी कोरोना आणि नंतर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्याने या निवडणुका खोळंबल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.या आदेशांचे पालन करताना नगर विकास विभागाने या अ, ब, क वर्ग 10 महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत; तर ड वर्ग 19 महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे.
महायुतीत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात 8 सप्टेंबर 2022 च्या अधिनयमानुसार अ, ब, क व ड वर्ग महापालिकांमध्ये चारसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीत तीन किंवा पाच सदस्य प्रभाग रचना असेल.
7 मार्च 2022 रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर 8 मार्च 2025 पासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. मुंबई महापालिकेसाठी 8 सप्टेंबर 2022च्या अधिनियमानुसार 227 प्रभागांनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रभाग रचना करताना महापालिका क्षेत्राची माहिती असणारा अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणकतज्ज्ञ यांची महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आधिकार देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेस सादर करतील. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांकडून प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येणार आहे.
आयोगाने मान्यता दिल्यानंतर प्रभाग रचना महापालिका आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. यावर सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल. ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करेपर्यंत ही प्रभाग रचना गुप्त ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.