

मुंबई ः लाडक्या बहिणींना आता 40 हजारांपर्यंत कर्ज दिले जाणार असून, सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या कर्जासंदर्भात आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. काही बँका पुढे आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या चालल्या आहेत. दरमहा दीड हजार रुपये लाडक्या बहिणींना दिले जातात. त्याऐवजी 40 हजार रुपयांपर्यंत उद्योग, व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचे आणि कर्जाचा हप्ता योजनेतून वळता केला जाईल, असे अजित पवार म्हणाले. पन्नास हजार रुपयेे भांडवल मिळाले तर बहिणी स्वतःचा व्यवसाय करू शकतील. त्यामुळे कुटुंब उभे करू शकतात, असेही ते म्हणाले
राज्यात लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे. नुकताच या योजनेचा दहावा हप्ता वितरित झाला आहे. आता सरकार या योजनेसाठी आणखी काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अजित पवार यांनी सांगितले की, लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा दीड हजार रुपये देत आहे. या योजनेवर सरकारचे 45 हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. मात्र, कोणत्याही स्थितीत ही योजना बंद होणार नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला.