Black magic fraud case : जादुटोण्याने पैसे दुप्पटचे आमिष दाखवून वकिलाला 20 लाखांचा गंडा
कोपरखैरणे : सट्टा बाजारात गुंतवणूक करा आणि काही दिवसांत भरघोस परतावा मिळवा असे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचे प्रकार रोज समोर येत आहेत. मात्र अवघ्या काही मिनिटात जादूद्वारे दुप्पट पैसे करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 20 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. याप्रकरणी संबंधित संशयित आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमसिंग साधू महाराज व अनंत नरहरी महाराज असे संशयितांची नावे आहेत, तर धर्मवीर त्रिपाठी असे फिर्यादींचे नाव आहे. त्रिपाठी हे स्वतः वकिलीचा व्यवसाय करतात. काही दिवासांपूर्वी हे दोन्ही संशयित त्रिपाठी यांच्या संपर्कात आले होते. त्यांनी सुरस किस्से सांगत पूजेद्वारे काहीही प्राप्त करू शकता अशी आमच्याकडे सिध्दी आहे, अशा प्रकारच्या थापा मारल्या. दुर्दैवाने त्रिपाठी यांचा दोन्ही संशयित आरोपींनी विश्वास संपादन केला. तुम्हालाही एका तंत्रमंत्र पूजेद्वारे पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवण्यात आले.
या आमिषाला बळी पडत तंत्रमंत्र 22 तारखेला करण्याचे नियोजन केले गेले. त्यानुसार सीबीडी सेक्टर 8 बी येथील गोमती इमारतीतील एका सदनिकेत तंत्रमंत्र पूजेची पूर्ण तयारी करून संध्याकाळी सहाच्या सुमारास विधी सुरु करण्यात आले. यावेळी पैसे दुप्पट करण्यासाठी वीस लाख रुपये असलेली बॅग फिर्यादींनी आरोपींकडे दिली.
काही वेळ पूजा केल्यावर त्रिपाठी यांना शयन कक्षात पांढरा कपडा समोर पसरून बसण्यास सांगितले. तसेच लक्ष्मी देवाय नमः हा मंत्र म्हणताच पांढर्या कपड्यावर 1 लवंग ठेवा असे सांगून दोघे शयन कक्षाबाहेर उरलेली पूजा करतो असे सांगून निघून गेले. काही वेळाने त्यांनी शयन कक्षाला बाहेरून कडी लावून रात्री आठच्या सुमारास गुपचूप पोबारा केला.
फिर्यादीला खोलीत कोंडले
खूप वेळ झाला तरी बैठकीत काहीही हालचाल नाही, आवाज नाही अशी शंका फिर्यादी यांना आली. त्यात बाहेरून कडी लावल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. शेवटी फोनाफोनी करून परिचित व्यक्तींना बोलावून ते बाहेर आले. यावेळी दोन्ही संशयित बॅगेतील पैशासह निघून गेले आणि फोनही लागत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीवरून सीबीडी पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

