

मुंबई : विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 7 ते 9 ऑगस्ट या कालावधी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची संधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) उपलब्ध करून देण्यात आली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त सरकारी सुट्टी जाहीर केली असली तरीही विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
राज्य सरकारने 8 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र शुक्रवारी सुटी असली तरी प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सामईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाची निवड यादी 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आली होती. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यासाठी 7 ते 9 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 686 विद्यार्थांनी प्रवेश घेतले. मात्र शुक्रवारी नारळी पौर्णिमेनिमित्त राज्य सरकारने सुटी जाहीर केल्याने प्रवेशासाठी असलेल्या तीन दिवसांतील एक दिवस कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.
पहिल्या फेरीमध्ये झालेल्या प्रवेशानंतर रिक्त झालेल्या तपशीलाची माहिती 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दुसर्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीतील प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना 14 ते 19 ऑगस्ट या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.