

घाटकोपर : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षानगर डोंगराळ भागात असलेल्या जनकल्याण सोसायटीवर दरडीचा भाग कोसळला. या दरडीचा मलबा थेट एका घरावर जाऊन पडला. या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबातील शालू मिश्रा (19) आणि सुरेश मिश्रा (50) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरती मिश्रा (45 ) आणि ऋतुराज मिश्रा (20) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वर्षानगरमधील हा डोंगराळ परिसर असून दाट लोकवस्तीने भरलेला आहे. या भागात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे सतत होणार्या अशा अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अपघातानंतर महापालिका प्रशासन व आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळावरील मलबा हटवून परिसरातील इतर घरे तातडीने रिकामी करण्यात आली आहेत.
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोर धरलेला असताना पवईतील आयआयटी परिसरातील फुलेनगर भागातही एका घराची भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दिनेश विश्वकर्मा (50 ) हे गंभीर जखमी झाले आहेत. विश्वकर्मा हे घराजवळून जात असताना अचानक भिंत कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
जोगेश्वरी पूर्वेतील दत्ता टेकडी परिसरात असलेल्या स्वामी समर्थ शाळेची भिंत कोसळून दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांच्या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळेची संरक्षक भिंत कमकुवत झाल्यामुळे कोसळण्याची घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
दत्ता टेकडी परिसरातील रहिवासी संरक्षक भिंतीला लागूनच दुचाकी मागील अनेक वर्षांपासून पार्क करतात. मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे अचानक मोठी संरक्षक भिंत कोसळून पाच ते सहा दुचाकीचे नुकसान झाले आहे.