

पश्चिम उपनगरांतील कांदिवली - मालाड पूर्वकडील श्रीरामनगर, तानाजीनगर आणि वडारपाडा येथील डोंगरावर वसलेल्या झोपडपट्टयांसाठी बांधण्यात आलेली संरक्षण भिंती जीर्ण आणि कमकुवत झाली आहे. त्यावर झाडे - झुडपे वाढली आहेत. परिणामी येथील झोपड्यांवर दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे. याकडे राज्य सरकार आणि म्हाडा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
गेल्या 40 ते 50 वर्षांपासून येथील झोपडपट्टी डोंगरावर वसलेली आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रहिवासी दरडीची दहशतीखाली राहतात. त्यांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकारचे लक्ष नसल्याने त्यांना आजही जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
सन 2004 साली माजी अमदार तथा तत्कालीन खासदार गजानन किर्तीकरण यांनी म्हाडाकडून श्रीरामनगर आणि तानाजी नगर या दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधली आहे. परंतु आता तिची अवस्था दयनीय झाली आहे. या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे उगविलेली आहेत. यामुळे काही ठिकाणी भिंतीला तडेही पडलेले आहेत. तसेच प्लास्टरही निखळून पडत आहे, अशी माहिती स्थानिक रहिवासी जयेश पावडे यांनी दिली.
येथील सुमारे 500 ते 1000 घरे दरडीच्या छायेखाली आहेत. गेल्या 15 वर्षांपुर्वी श्रीरामनगर येथील एका घरावर दरड कोसळून एका महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता. यानंतर येथे संरक्षण भिंत उभारली होती. परंतु आता ती कमकुवत झाली आहे. यामुळे ती कधीही कोसळून जीवितहानी होऊ शकते, अशी भीती स्थानिक रहिवासी शिवाजी मोरे यांनी व्यक्त केली.
तानाजीनगर येथील डोंगरावर बांधलेल्या संरक्षण भिंतीवर येथील नागरिकांनी अतिक्रमण करून भिंतीपर्यंत बांधकामे उभारली आहेत. यामुळे भिंतीवर अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी संरक्षण भिंतीखाली असलेल्या श्रीराम नगरातील झोपडपट्टीवासियांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या अनधिकृत व वाढीव बांधकामांकडे पालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याने तानाजी नगरसह श्रीरामनगरातील झोपडीधारकांचा नाहक बळी जाऊ शकतो, असा आरोप श्रीरामनगरांतील झोपडीधारकांकडून करण्यात येत आहे.
डोंगरावर वसलेल्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध असलेली शौचालये अपुरी पडत आहेत. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महिला आणि लहान मुलांची कुंचबणा होत आहे. यामुळे शौचालयाची संख्या वाढविण्याची मागणी जयेश पावडे यांनी केली आहे.
श्रीरामनगर येथील शिवाजी खोत यांच्या घरांवर 15 वर्षांपूर्वी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत त्यांची पत्नी आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तसेच 3 ते 4 घरांचे नुकसानही झाले होते. यानंतर आमदार निधीतून म्हाडा प्रशासनाकडून संरक्षण भिंत बांधून दिली होती. परंतु दरडीची भीती आजही कायम आहे.
शिवाजी मोरे, स्थानिक रहिवासी
मी यापूर्वी त्रिवेणीनगर, तानाजीनगर याठिकाणी दरडीवरील वस्तीसाठी संरक्षण भिंत बांधलेली आहे. लवकरच श्रीरामनगर येथील वस्तीची पाहणी करून पावसाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे निर्देश देण्यात येतील.
अतुल भातखळकर, आमदार, कांदिवली पूर्व
मी रतनभाई धुमाडे चाळीत 40 वर्षांपासून राहतो. संरक्षण भितीची दुरावस्था झाली आहे. सन 2004 साली बांधली यानंतर तिच्याकडे कुणी लक्ष दिले नाही. आता तिची नवीन बांधणे गरजेचे आहे.
रफिक पठाण, स्थानिक रहिवासी