मुंबई : लालबाग चिवडा गल्ली येथून तावरीपाडापर्यंत असलेल्या जलवाहिनीमधील अडकलेला कचरा फ्लशिंग करून काढण्यात येत आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर या परिसरातील कमी दाबाचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
तावरीपाडा परिसरातील दत्तविला सोसायटी, साई दत्त सोसायटी, रॉयल रेसिडेन्सी, कृष्णविहार सोसायटी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याबाबत अनेक तक्रारी केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाच्या पथकाने तपासणी केली. यात चिवडा गल्लीतून तावरीपाडापर्यंत टाकलेली वाहिनी कचरा व अस्वच्छ पाण्याने भरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जलवाहिनीचे फ्लशिंग करण्यासाठी हायड्रंट बसवण्यात आला आहे. दोन ते तीन दिवस या ठिकाणी फ्लशिंग करून जलवाहिनीमधील खराब पाणी, कचरा बाहेर काढला जाणार आहे. या कामामुळे या जलवाहिनीमधून पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे परळ, लालबाग विभागात भासणारी पाणीटंचाई दूर होईल, असा विश्वासही पालिकेकडून व्यक्त केला आहे.
जलवाहिनीमध्ये कचरा कसा
चिवडा गल्ली येथून तावरीपाडापर्यंत असलेली जलवाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आलेली नाही. त्यामुळे जलवान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ निर्माण होऊन कचरा निर्माण झाला. जमिनीखाली असल्यामुळे अनेकदा मातीचाही शिरकाव होतो. पण हे प्रमाण अल्प आहे. जलवाहिनी फुटली असेल व ती दुरुस्त करताना जलवाहिनीमध्ये माती जाण्याची शक्यता असते, असे एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.