

मुंबई : नरोत्तमदास आणि वर्जीवंदास हा दोन सख्ख्या भावांनी वडील माधवदास रणछोड्दास यांच्या आठवणीत बांधलेल्या पुरातन आणि ऐतिहासिक लक्ष्मीनारायण मंदिराला आजघडीला १५० दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हापासून मंदिरात दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी लक्ष्मीनारायणाला भोग चढवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून भव्य दिव्य अन्नकोटाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मिठाई ड्रायफ्रूट आणि हाताने पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या विविध अन्नपदार्थांचा भोग चढवण्याची जुनी पद्धत आजही कायम आहे.
लक्ष्मीनारायणाला भोग चढवण्यासाठी खास वृंदावन येथून काही आचारी बोलवण्यात आले होते. या आचाऱ्यांनी मिळून साधारण शंभरच्या वर विविध गोड, स्वादिष्ट अन्नपदार्थ स्वतःच्या हाताने तयार केले होते. त्यामध्ये पिस्ता कतली, बदाम कतली, मोहन थाळ, मेवावाटी, साकडी, शेवगाठीया, चक्री, फारसी पुरी अशा स्वादिष्ट आणि एकापेक्षा एक अन्नपदार्थांच्या डिश आचाऱ्यांनी तयार केल्या होत्या. त्यात फळांचाही समावेश होता. या अन्नपदार्थांचा भोग लक्ष्मीनारायणला अर्पण करण्यात आला.
अन्नकूटचा हा विलक्षण कार्यक्रम पाहण्यासाठी माधवबाग मंदिरात विविध ठिकाणच्या भक्त मंडळींची एकच गर्दी झाली होती. अन्नकोटाचे पदार्थ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत होते. भक्तमंडळी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात लक्ष्मी नारायणाच्या पुरातन मंदिरासह लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीचे आणि अन्नकोटाचे फोटो व्हिडिओ सेल्फी काढून जतन करत होते. रात्र होण्यापूर्वी अन्नकोटीतील पदार्थांचे भाविकांना प्रसादरुपी करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.