

सिल्लोड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ भाऊबीज, राखी पौर्णिमेपुरती नसून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कायमची राबवली जाणार आहे. विरोधकांनी कितीही वावड्या उठवल्या, खोडे घातले तरीही भावाचा शब्द आहे, ही योजना महिलांसाठी पुढे कायम राहील. ही योजना बहिणींसाठी माहेरची मदत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. पालकमंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महिलांना फक्त दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणून चालणार नाही. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणे काळाची गरज आहे. महिला शक्ती हीच खरी देशाची शक्ती आहे. महिला सक्षम झाल्यास देश पुढे जाईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी अर्ज केले असून, त्यातील दोन लाखांहून अधिक अर्जाची छाननी प्रशासनाने केली आहे. महायुतीच्या शासनाने महिलांसाठी एसटी प्रवास पन्नास टक्के सूट, मुलींना मोफत शिक्षण असे अनेक निर्णय घेतले आहेत. महिला बचत गटांना विविध माध्यमातून आर्थिक मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लोकसभेत केलेली चूक विधानसभेत होऊ देऊ नका. महायुतीचे सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, युवती, सर्वसामान्यांचा आधार आहे. केवळ घोषणा करणारे सरकार नसून, योजना कृतीत आणणारे सरकार आहे. योजना कायम सुरू राहावी यासाठी बहिणींनी भावाला भरभरून आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, येणाऱ्या निवडणुकीत पराभव दिसून येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. हे सरकार देणारे असून घेणारे नाही. दोन वर्षांपूर्वी दळभद्री सरकार तुमच्या आशीर्वादाने घालवून सर्वसामान्यांचे सरकार आणले, असे ते म्हणाले.