

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व सल्लागार ग. दि. कुलथे (८७) यांचे सोमवारी रात्री ८.३० वा. नवी मुंबईतील नेरुळ येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवार दिनांक १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता नेरुळ सेक्टर ४ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी कामगार संघटनेसाठी अहोरात्र काम केले. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले. हे करत असताना त्यांनी संपा सारख्या हत्याराचा वापर करणे अनेकदा टाळले. चर्चेतून प्रश्न सोडविण्यावर त्यांचा अधिक भर होता. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप कधीही ताणला गेला नाही. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पगार, भत्ते, निवृत्ती वेतन असते. असे असतानाही मागील काही वर्षांमध्ये अनेक कर्मचारी भ्रष्टाचारामध्ये सापडले. ही खंत बाळगून त्यांनी राज्य महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे 'पगारात भागवा' या अभियानाची घोषणा केली होती. या अभियानानुसार अधिकारी महासंघातर्फे दशसूत्रीच्या अंमलबजावणीचे पत्रक राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुलथे यांच्या निधनावर दुः ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने काम करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा-संवाद करण्याचा प्रसंग अनेकवेळा आला. अतिशय संयमी आणि प्रशासन म्हणून राज्य सरकारचेही कुठे हित आहे, याचा जबाबदारीने विचार करणारे असेच ते नेतृत्व होते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कुलथे यांना श्रद्धांजली वाहिली.