

मुंबई : मे महिन्यात सुरू करण्याचे नियोजन असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर (एससीएलआर) 100 मीटरचे तीव्र वळण असलेला दक्षिण आशियातील पहिला केबल-स्टेड ब्रिज उभारण्यात आला आहे.
215 मीटर लांबीचा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक असलेला हा पूल असून तो पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जातो व तो जमिनीपासून 25 मीटर उंचीवर आहे. 10.5 मीटर ते 17.2 मीटर रूंद असा हा दोन पदरी मार्ग आहे. एससीएलआर विस्तारित मार्गाचे बांधकाम करताना भूमिगत मेट्रो 3 मार्गिका आणि इतर भूमिगत सुविधांना धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आली.
या मार्गाचे 100 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या या रस्त्यावर सूचना फलक लावणे, केबल-स्टेड ब्रिजखालील तात्पुरते आधार काढणे, रंगकाम व अंतिम सौंदर्यीकरण, पथदिवे आणि मध्यवर्ती लँडस्केपिंग ही कामे करण्यात येत आहेत.
पूर्व द्रुतगती मार्गावरून पश्चिम द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी 5.4 किमी लांबीच्या एससीएलआरचा वापर होतो. सांताक्रूझ पूर्व येथे पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ डॉ. हंस भुगरा जंक्शन येथे या मार्गाची सुरुवात होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाजवळून हा मार्ग जातो व मिठी नदी ओलांडून लाल बहादूर शास्त्री मार्गाला जोडतो. या मार्गाच्या विस्ताराचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले होते.
एससीएलआरवरून पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आल्यानंतर खाली उतरताना वाहनांना सिग्नलसाठी थांबावे लागते. तिथून पुढे विलेपार्लेच्या दिशेने जाताना सांताक्रूझ रेल्वे स्थानकाजवळ आणखी एक सिग्नल लागतो. या दोन्ही सिग्नलमुळे वाहतूक कोंडी होते व प्रवासाचा वेळ वाढतो. विस्तारित मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी करणे शक्य होणार आहे. एससीएलआरवरून आलेली वाहने पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ खाली न उतरता विस्तारित मार्गावरून विलेपार्लेच्या दिशेने पुढे सरकतील. यामुळे दोन्ही सिग्नल टाळता येतील व कुर्ला ते विलेपार्ले हे अंतर अर्ध्या तासात पार करणे शक्य होईल.